व्यंकटगिरीवरील बालीजी मंदीरात ब्रह्मोत्सवाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 01:28 AM2017-11-27T01:28:03+5:302017-11-27T01:32:13+5:30
व्यंकटगिरीवरील बालीजी मंदीरात सुरू असलेल्या ब्रह्मोत्सवाची २५ नोव्हेंबर रोजी श्री बालाजींच्या मूळ मूर्तीची १0८ कलश पंचामृत अभिषेक, महाकुंभ अभिषेक तसेच महाप्रसादाने सांगता करण्यात आली. यावेळी पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: येथील व्यंकटगिरीवरील बालीजी मंदीरात सुरू असलेल्या ब्रह्मोत्सवाची २५ नोव्हेंबर रोजी श्री बालाजींच्या मूळ मूर्तीची १0८ कलश पंचामृत अभिषेक, महाकुंभ अभिषेक तसेच महाप्रसादाने सांगता करण्यात आली. यावेळी पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
२३ नोव्हेंबर रोजी व्यंकटगिरी बालाजी मंदिर येथे सुरू झालेल्या ब्रह्मोत्सवात विविध धार्मिक विधी, याग व कार्यक्रम पार पडले. दरम्यान, शिवराज महाराज शास्त्री व जगतगुरू तुकोबारायांचे वंशज गुरू कान्होबा महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घेतला. महोत्सवाच्या आजच्या समारोपीय दिवशी सकाळी ६ वाजता यज्ञयाग व श्रींच्या मूर्तीची विधीवत पूजा करण्यात आली. १0 वाजता १0८ कलशांचे आवाहन व षोडसोपचार पूजा करण्यात आली. १0.३0 वाजता श्री बालाजींच्या मूळ मूर्तीचा १0८ महाकुंभ अभिषेक व मूर्तीचे चक्रस्थान करून महाआरती करण्यात आली.
सकाळी ११ वाजता श्री गुरू कान्होबा महाराज देहूकर यांचे काल्याचे कीर्तन पार पडले. यावेळी हजारो महिला, पुरुष भाविकांनी कीर्तनाचा आनंद घेतला. यावेळी गोविंदा गोविंदाच्या जयघोषाने व्यंकटगिरी परिसर दुमदुमून गेला. दुपारी १ वाजता महाप्रसादाला प्रारंभ झाला. सायंकाळी उशिरापर्यंत महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. पंचक्रोशीसह जिल्ह्यातील अनेक ठिकाणाहून आलेल्या हजारो महिला, पुरुष भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. तर यावर्षी १६४ पुरुष व ८८ महिला अशा १५२ भाविकांनी कल्याण कट्टा करून आपले सौंदर्य श्रीं चरणी अर्पण केले.