खामगाव-सप्तश्रुंगी बसचे ब्रेक निकामी; चालक-वाहकाच्या सतर्कतेने अनर्थ टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2023 02:46 PM2023-07-24T14:46:39+5:302023-07-24T14:47:02+5:30
खामगाव आगाराची बस क्रमांक एमएच-४०, वाय-५९०२ ही गाडी मलकापुरातून पुढे जाण्यासाठी निघाली
अनिल गोठी
मलकापूर (बुलढाणा) : खामगाव आगारातून सप्तश्रुंगीकडे जाणाऱ्या बसचे मलकापूर शहरातील महावीर चौकात ब्रेक निकामी झाले. यावेळी चालक-वाहकाने प्रसंगावधान राखत बस नियंत्रित केली. तसेच रस्त्याच्या कडेला लावण्यात आली. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांसह बसमधील प्रवाशांचा धोका टळला.
खामगाव आगाराची बस क्रमांक एमएच-४०, वाय-५९०२ ही गाडी मलकापुरातून पुढे जाण्यासाठी निघाली. त्यावेळी महावीर भवन चौकात ट्रक आला. त्यामुळे चालकाने ब्रेक दाबला. मात्र, बस थांबली नाही. ही बाब चालक अमोल केणेकर यांनी तातडीने वाहक कमल वाघ यांना सांगितली. वाहकाने तातडीने चालत्या गाडीतून खाली उडी घेतली. तसेच बसच्या पुढील चाकासमोर मोठा दगड ठेवला. त्यामुळे बस थांबली. बसमधील ३५ प्रवासी खाली उतरले. चालकाने घटनेची माहिती मलकापूर आगार व्यवस्थापक मुकुंद न्हावकर यांना दिली. बसची दुरुस्ती करून आगारात आणण्यात आली.
सप्तश्रुंगी बसचा झाला होता अपघात
खामगाव आगाराची सप्तश्रुंगी येथे गेलेली बस परतीच्या प्रवासात असताना १२ जुलै रोजी नाशिक जिल्ह्यात डोंगरकड्यात असलेल्या रस्त्याखाली घसरली होती. ती काही दिवसांपूर्वीच काढण्यात आली. त्यानंतर आता सप्तश्रुंगीकडे जाणाऱ्या बसचे ब्रेक निकामी झाल्याने खामगाव आगारातील बसची अवस्था कशी आहे, हे अधोरेखित झाले आहे.