सिंदखेडराजातील ५० कोटींच्या गुंतवणुकाला ब्रेक?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:34 AM2021-05-26T04:34:52+5:302021-05-26T04:34:52+5:30
सिंदखेडराजा : केंद्र सरकारचे मेक इन इंडिया अंतर्गत उद्योगांना उभारी देण्याचे धोरण असले तरी सिंदखेडराजा येथे स्थापन करण्यात ...
सिंदखेडराजा : केंद्र सरकारचे मेक इन इंडिया अंतर्गत उद्योगांना उभारी देण्याचे धोरण असले तरी सिंदखेडराजा येथे स्थापन करण्यात आलेल्या ५० कोटी रुपयांच्या टिश्यू कल्चर प्रोजेक्टला वीज पुरवठ्यातील अडथळ्यामुळे मोठा फटका बसत आहे. त्यामुळे आणखी ५० कोटी रुपये खर्च करून येथे उभारण्यात येणाऱ्या ईश्ववेद फूड प्रोसेसिंग प्रकल्पासाठी करण्यात येणाऱ्या गुंतवणुकीलाच ब्रेक लागण्याची शक्यता आहे.
सिंदखेड राजाचे भूमिपुत्र तथा ईश्ववेद उद्योगाचे व्यवस्थापकीय संचालक संजय वायाळ यांनी या अडथळ्याच्या शर्यतीमुळे सिंदखेडराजात उभारण्यात येणारा खाद्य प्रक्रिया उद्योग अन्यत्र हलविण्याची मानसिकाता बनली आहे. वास्तविक त्यांनी २०१४ मध्ये ईश्ववेद बायोटेक नावाने टिश्यू कल्चर प्रकल्प मोठी गुंतवणूक करून सिंदखेडराजा येथे सुरू केला होता. या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी सिंदखेडराजातील २०० व परिसरातील २०० अशा ४०० जणांना रोजगार उपलब्ध करून दिला. मात्र सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याच्या समस्येमुळे या उद्योगाला येथे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सिंदखेडराजात सुरू करावयाचा नवीन खाद्य प्रक्रिया उद्योग ते अन्यत्र उभारणार आहेत.
मुळात अैाद्योगिकदृष्ट्या डी प्लसमध्ये असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात खामगाव, मलकापूर व काही प्रमाणात चिखली येथे उद्योग सुरू आहेत. त्यामुळे सिंदखेडराजा येथे उद्योग उभारल्या जात असेल तर तो जिल्ह्यासाठी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्पच ठरावा. पण सिंदखेडराजा येथे उद्योगासाठी करण्यात आलेल्या गुंतवणुकीचा अभिमान बाळगावा की मनस्ताप सहन करावा अशी मानसिकता सध्या संजय वायाळ यांची बनली आहे. कारण ‘ईश्ववेद’साठी वीज वितरण कंपनीकडून स्वतंत्र फिडर मिळावे यासाठी वायाळ यांनी गेल्या तीन वर्षांपासून प्रयत्न सुरू केले. महावितरणच्या स्थानिक कार्यालयापासून ते वरिष्ठ कार्यालयापर्यंत अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यात आला. पण एक्स्प्रेस फीडर सोडा पण विजेच्या वाढत्या फ्लकचुवेशनचा मोठा फटका सध्या कार्यरत असलेल्या टिश्यू कल्चर उद्योगाला बसत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतरही प्रश्न सुटण्याऐवजी त्यांच्या अनाकलनीय उत्तरांनी मनस्ताप होत असल्याचे वायाळ यांचे म्हणणे आहे. टिश्यू कल्चर प्रकल्प मोठ्या उत्साहाने इथे आणला पण आगामी फूड प्रोसेसिंग प्रोजेक्ट आपण सिंदखेडराजा येथे स्थापन करणार नसल्याचे वायाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
--प्रोजेक्ट अन्यत्र उभारणार--
या प्रोजेक्टसाठी ५० कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून याद्वारे शेकडो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार होता तर ५ हजार शेतकऱ्यांना यात सामावून घेण्याची क्षमता होती. परंतु महावितरणच्या चुकीच्या धोरणामुळे आपल्याला हा प्रोजेक्ट येथे स्थापन करणे शक्य नसल्याची उद्विग्न प्रतिक्रिया ईश्ववेद व्यवस्थापकीय संचालक संजय वायाळ यांनी दिली आहे.
-------------------
ईश्ववेद कंपनीला सध्या जेथून वीज कनेक्शन देण्यात आले आहे ते गावठाण फीडरवरून आहे. या फीडरवर आसपासच्या १३ गावांना वीज पुरवठा होतो. या १३ गावात विजेसंदर्भात कुठेही अडचण आल्यास संपूर्ण वीज पुरवठा खंडित करावा लागतो. त्यामुळे कंपनीला खंडित वीज पुरवठ्याच्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे कंपनी असलेला भाग हा औद्योगिक क्षेत्र नाही. त्यामुळे तेथे आवश्यक वीज सुविधा नाहीत. कंपनीला अखंडित वीज पुरवठा हवा असल्यास त्यांना एक्स्प्रेस फीडर स्वतः च्या खर्चातून घ्यावे लागणार आहे. त्यांनी तसा प्रस्ताव दिल्यास वीज कंपनी संपूर्ण सहकार्य करेल.
(ए. एम. खान, उपअभियंता, महावितरण कंपनी, सिंदखेडराजा)