लाचखोर सहायक लेखाधिका-यासह दोघे कारागृहात
By Admin | Published: August 27, 2016 03:04 AM2016-08-27T03:04:27+5:302016-08-27T03:04:27+5:30
प्रवास भत्त्याची रक्कम देण्यासाठी मागितली होती लाच.
अकोला, दि. २६ : मूर्तिजापूर पंचायत समितीमधील एका कर्मचार्याला प्रवास भत्त्याची रक्कम देण्यासाठी लाच मागणारे आणि पोलीस कोठडीत असलेले सहायक लेखाधिकारी व कनिष्ठ सहायक यांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या दोन्ही आरोपींनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला असता दोन्ही आरोपींच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे. मूर्तिजापूर पंचायत समितीमधील तक्रारदाराचे कार्यालयीन प्रवास भत्त्याचे ४४ हजार रुपयांचे देयक काढायचे होते. या देयकासाठी पं. स. मूर्तिजापूर येथील सहायक लेखाधिकारी अरविंद डाखोरे याने तक्रारदाराला आधी २0 टक्के रकमेची लाच मागितली. याबाबत संबंधित तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीवरून एसीबीच्या अधिकार्यांनी सापळा रचला. २0 टक्के रक्कम लाच म्हणून मागणार्या डाखोरे यांनी नंतर १५ टक्के रकमेवर तडजोड केली. त्यानुसार ६ हजार ५00 रुपयांची लाच घेताना जामठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे कनिष्ठ सहायक योगेश कुलकर्णी आणि पंचायत समितीचे सहायक लेखाधिकारी अरविंद डाखोरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहात अटक केली. या दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली. शुक्रवारी पोलीस कोठडी संपल्याने या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली. त्यानंतर दोन्ही आरोपींनी जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला मात्र न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी सोमवारी ठेवली आहे.