लाेकवर्गणीतून बांधलेला पूल गेला वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:24 AM2021-07-10T04:24:17+5:302021-07-10T04:24:17+5:30
साखरखेर्डा : परिसरात २८ जूनला झालेल्या अतिवृष्टीमुळे मोहाडी ते माळखेड रस्ता पाण्याखाली गेला होता. पुरात मोहाडी नदीवर ...
साखरखेर्डा : परिसरात २८ जूनला झालेल्या अतिवृष्टीमुळे मोहाडी ते माळखेड रस्ता पाण्याखाली गेला होता. पुरात मोहाडी नदीवर ग्रामस्थांनी लोकवर्गणी करून बांधलेला पूलही वाहून गेला़ त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ताच राहिला नाही़ हा पूल तातडीने बांधण्याची मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे़
गेले काही दिवसांपूर्वी आमखेड तलाव फुटल्याने मोहाडी येथील जुना साखरखेर्डा-लव्हाळा शेत रस्ते वाहून गेला होता. त्याचबरोबर अनेक हेक्टर शेतजमीन वाहून गेली होती़ त्यामुळे दुबार पेरणीचे संकट उभे राहिले. शेतीतील पाण्याचे निचरा झाल्याने पेरणीसाठी उसनवारी करून बी- बियाणे घेतली. शेतात जाणारा रस्ताच वाहून गेल्याने शेतकऱ्यांना नदी पलीकडे जाणे खूप कठीण झाले आहे़ नदीला पुन्हा पुन्हा येणारा पूर त्यात एक नवीन समस्येची भर घालत आहे. हा पूल वाहून गेल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता राहिला नाही, याची माहिती खा. प्रतापराव जाधव यांना ग्रामस्थांनी दिली होती; परंतु अद्याप जिल्हा परिषद बांधकाम विभागाने कोणतेच पाऊल उचलले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नदीच्या पात्रातून रस्ता शोधत जावे लागते़ या पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ऋषिकेश रिंढे, नारायण रिंढे, परमेश्वर रिंढे, समाधान रिंढे, प्रल्हाद रिंढे, सुनील रिंढे, गजानन रिंढे, कचरू इंगळे, मदन इंगळे, प्रल्हाद इंगळे, वसंता इंगळे, विजय रिंढे, मधुकर रिंढे, विलास रिंढे,अविनाश इंगळे, अविनाश रिंढे, आदी शेतकऱ्यांनी केली आहे़