जालना-बुलडाण्याला जोडणारा पुल गेला वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 04:13 PM2020-09-16T16:13:28+5:302020-09-16T16:13:49+5:30
सोनोशी गावालगतच्या नदीवरील पुल १५ सप्टेंबर रोजी झालेल्या दमदार पावसामुळे वाहून गेला आहे
सोनोशी: सिंदखेड राजा तालुक्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या सोनोशी गावालगतच्या नदीवरील पुल १५ सप्टेंबर रोजी झालेल्या दमदार पावसामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे जालना-बुलडाणा जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सिंदखेड राजा तालुक्याच्या मराठवाड्याच्या सिमेलगत असलेल्या या भागात १५ सप्टेंबरला दुपारी चार वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सोनोशी व जालना जिल्ह्यातील शेवली या सात किमी अंतरावरील गावाला जोडणारा नदीवरील पुल वाहून गेला. मुळात आधीच हा पुल क्षतीग्रस्त झालेला होता. त्यामुळे या भागातील नागरिकांची आता अडचण झाली आहे. तसेच मोठी वाहनेही या मार्गावरून जाण्यात अडचण झाली आहे. परिणामी हा पुल त्वरित दुरुस्त करून या भागातील दळणवळण पुर्ववत व्हावे, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. स्थानिक नागरिकही तशी मागणी करत आहेत.
सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी बुद्रूककडून जालना जिल्ह्यातील शेवली गावाकडे जाणारी वाहतूक यामुळे आता प्रभावीत झाली आहे. तसा हा पुल बराच जुना होता. या पुलाची उंचीही कमी होती. त्यामुळे पावसाळ््यात नदीला पुर आला की दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प होत होती. त्यामुळे आता पुलाचा बराचसा भाग वाहून गेल्यामुळे हा पुल नव्याने करावा लागणार आहे. त्याची केवळ दुरुस्ती न करता या पुलाची उंचीही वाढविल्यास जालना आणि बुलडाणा जिल्ह्यातील अंतर्गत ग्रामीण भागातील संपर्क कायमस्वरुपी सुरळीत होण्यास मदत होणार आहे.