कोराडी नदीवरील पूल ठरतोय धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:24 AM2021-06-11T04:24:00+5:302021-06-11T04:24:00+5:30
शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याने तोही बंद झाला आहे. याची सार्वजनिक पाटबंधारे विभागाने दखल घ्यावी, अशी मागणी ...
शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याने तोही बंद झाला आहे. याची सार्वजनिक पाटबंधारे विभागाने दखल घ्यावी, अशी मागणी सरपंच शिवाजी लहाने यांनी केली आहे.
कोराडी नदीवर शेवगा जाहागीर येथे धरणाची निर्मिती झाली. यामुळे सवडद ते गजरखेड हा रस्ता पाण्याखाली गेला. बाराही महिने पुलाखाली पाणी असते. या पाण्याच्या प्रवाहामुळे पुलाची दुरवस्था झाली आहे. या कोराडी नदीवर पूल उभारताना पोग्याचा वापर न करता काँक्रीटची उभारणी करून पूल बांधणी करावी, अशी मागणी होत आहे. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याने पुलावरील लोखंडी गजही उघडे पडले आहेत. या रस्त्यावरील संपूर्ण रहदारी खड्ड्यांमुळे बंद पडली आहे. सध्या खरीप हंगाम लागल्यामुळे शेतीतील कामे करण्यासाठी शेतकऱ्यांनासुद्धा शेतामध्ये जाता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ९ जून रोजी सवडदचे सरपंच शिवाजी लहाने यांनी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, मेहकर व जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, देऊळगाव राजा यांना या कोराडी नदीवरील पुलासंदर्भामध्ये निवेदन दिले. मेहकर उपविभाग व देऊळगाव राजा उपविभाग यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी टोलवाटोलवीची उत्तर दिले असल्याचे सरपंच लहाने यांनी सांगितले.
रहदारीचा प्रश्न
कोराडी पुलावरून रहदारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या रस्त्याची कोणताच विभाग दखल घ्यायला तयार नसल्याने सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. या रखडलेल्या पुलाचे काम न झाल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.