करवंड येथे शेतीच्या वादातून सख्या भावाने चाकूने भोसकले, गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 06:31 PM2018-05-14T18:31:40+5:302018-05-14T18:31:40+5:30
अमडापूर : चिखली तालुक्यातील करवंड येथे शेतीचा व जागेच्या जुन्या वादातून सख्या भावास चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी घडली.
अमडापूर : चिखली तालुक्यातील करवंड येथे शेतीचा व जागेच्या जुन्या वादातून सख्या भावास चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी घडली. या प्रकरणी आरोपी भावाविरूध्द १४ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमडापूर येथून जवळच असलेल्या करवंड येथील प्रदीप गणपत जाधव व भाऊ अजित उर्फ भैय्यासाहेब गणपत जाधव या सख्या भावंडांची शेती व जागेचा जुना वाद सुरू आहे. या वादावरून १२ मे रोजी सकाळी ९.३० वाजेला प्रदीप गणपत जाधव हे गावातील राम मंदिराजवळ बसलेले असताना आरोपी भाऊ अजित उर्फ भैय्यासाहेब गणपत जाधव याने अचानक येवून हातातील चाकूने पोटावर पाठीवर, डाव्या हाताच्या दंडावर सपासप वार करून गंभीर जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही लोकांनी जखमी प्रदीप जाधव यांना बुलडाणा सामान्य रूग्णालयामध्ये उपचारासाठी नेले तेथून त्यांना औरंगाबाद येथे उपचारासाठी भरती करण्यात आले. १३ मे रोजी जखमी प्रदीप जाधव यांचा अमडापूर पोलिसांनी जवाब घेवून १४ मे रोजी प्रदीप जाधव (वय ५४) रा.करवंड यांच्या जबाबावरून आरोपी भाऊ अजित उर्फ भैय्यासाहेब जाधव रा.करवंड याच्याविरूध्द कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय उमेश भोसले, पोहेकॉ शाकीर पटेल, सुधन सुसर, सुनिल चौधरी हे करीत आहेत.
(वार्ताहर)