एसटी वाहक तरुणीची गळा चिरून निर्घृण हत्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:34 AM2021-04-17T04:34:59+5:302021-04-17T04:34:59+5:30
माधुरी भीमराव मोरे (२५, रा. अंत्री खेडेकर) असे मृत तरुणीचे नाव आहे. बुलडाणा आगारात वाहक पदावर त्या कार्यरत होत्या. ...
माधुरी भीमराव मोरे (२५, रा. अंत्री खेडेकर) असे मृत तरुणीचे नाव आहे. बुलडाणा आगारात वाहक पदावर त्या कार्यरत होत्या. १५ एप्रिलची ड्यूटी संपल्यानंतर आठवडी सुटी असल्याने अंत्री खेडेकरला घरी परतणार होत्या. मात्र, रात्री त्या घरी पोहोचल्या नाही. १६ एप्रिलच्या सकाळी अंत्री खेडेकर शिवरात मॉर्निंग वाॅकसाठी गेलेल्या नागरिकांना त्यांचा मृतदेह आढळून आला. याबाबत अंढेरा पोलिसांना माहिती दिली असता ठाणेदार राजरत्न आठवले यांनी पथकासह घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असता तरुणीचा गळा चिरलेला व शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याचे तसेच चटके दिल्याच्या खुणा पार्थिवावर आढळून आल्या आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून त्या साखळी येथील मावशीच्या घरी मुक्कामी होत्या. साप्ताहिक सुटी असल्याने त्या मूळगावी जात होत्या. त्यादरम्यान १६ एप्रिल रोजी त्यांचा मृतदेह अंत्री खेडेकर गावाच्या शिवारात आढळला.
घटनेचे गांभीर्य पाहता बुलडाणा येथून श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. ठसेतज्ज्ञांनी घटनास्थळाची पाहणी केली असून आवश्यक अशी माहिती व काही पुरावे हस्तगत केले आहेत. मृत महिला माधुरी मोरे यांचा ५ वर्षांपूर्वी घटस्फोट झालेला आहे. यापूर्वी त्या जाफराबाद आगारात कार्यरत होत्या. तेथे एक वाहक त्यांची नेहमीच छेड काढत होता, अशी चर्चा आहे. त्याला कंटाळून माधुरी मोरे यांनी बुलडाणा आगारात बदली करून घेतली होती, अशी माहिती आहे.
--जाफराबाद आगारातील वाहकास अटक--
दरम्यान याप्रकरणी अंढेरा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगावे फिरवत अवघ्या सात ते आठ तासांत जाफराबाद आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेल्या अनिल अमिन भोसले यास ताब्यात घेतले आहे. त्याची सध्या आम्ही कसून चौकशी करत आहोत, असे अंढेऱ्याचे ठाणेदार राजवंत आठवले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.