'बीएसएनएल'ला ‘नॉट रिचेबल’चे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 03:02 PM2019-05-17T15:02:09+5:302019-05-17T15:02:18+5:30
बुलडाणा: जिल्ह्यात दूरसंचारला ‘नॉट रिचेबल’चे ग्रहण लागले असून, यात भारत संचार निगम लिमीटेडची (बीएसएनएल) सुविधा मागे पडत आ
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात दूरसंचारला ‘नॉट रिचेबल’चे ग्रहण लागले असून, यात भारत संचार निगम लिमीटेडची (बीएसएनएल) सुविधा मागे पडत आहे. १७ मे रोजी जागतिक दूरसंचार दिनाच्या पार्श्वभूमीवर दूरसंचारची माहिती घेतली असता जिल्ह्यात खाजगी दूरध्वनीलाच पसंती मिळत असून, बीएसएनएलकडे ग्राहक पाठ फिरवत असल्याची माहिती समोर आली.
भारत संचार निगम लिमिटेड हा भारत सरकारचा अधिकृत उद्योग आहे. पूर्वीचे दूरसंचार व डाक तार खाते यांच्या एकत्रीकरणातून दूरसंचार विभाग हा स्वतंत्रपणे अस्तित्वात आला. या दूरसंचार विभागाचे १ आॅक्टोबर २००० रोजी भारत संचार निगम लिमिटेड या कंपनीत रूपांतर झाले. परंतू आजरोजी भारत संचार निगम लिमीटेडची उत्तम दर्जाची सेवा कोलमडली आहे. ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेल्या बीएसएनएलला आज अवकळा आली आहे.
बीएसएनएलची सेवा वांरवार विस्कळीत होत आहे. गेल्या काही महिन्यापासून तर इंटरनेटची सुविधाही नावालाच उरलेली आहे. भारत संचार निगम लिमीटेड बुलडाणा जिल्हा मुख्य कार्यालयात अनेकवेळा तक्रारी देऊनही त्यावर तात्पुरती दुरूस्ती केल्या जाते; मात्र पुन्हा परिस्थिती जैसे थे होत आहे.
दुरसंचार जिल्ह्यात हजारो किलोमीटर क्षेत्रामध्ये पसरलेले असून त्याचा लाखो ग्राहक वापर करत आहेत. यातील ७५ टक्क्यापर्यंत ग्रामीण क्षेत्रामध्ये सेवा दिली जाते. परंतु ही सेवा देताना ग्रामीण भागात अनेक अडचणी येत आहे. त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी महामार्गाच्या कामादरम्यान काढलेल्या फोन लाइनचे काम आतापर्यंत पूर्ण झालेले नाहीत. काही भागातील फोन केबल तोडल्यामुळे सतत फोन बंद असतात. तर अनेक गावामध्ये कुठल्याच कंपनीचे काहीच नेटवर्क मिळत नाही; परिणामी काही लोकांनी बीएसएनएलची सेवा वापरणे बंद केले.
बँक व्यवहार वारंवार ठप्प
जिल्ह्यात विकासाच्या रस्ता व इतर खोदकामांमुळे विस्कळीत झालेल्या इतर लाईन अजून सुध्दा दुरुस्ती करण्यात आलेल्या नाहीत. या मुळे फोन जास्त वेळ बंदच असतात व शासनाच्या आॅनलाईनच्या कामामध्ये दिरंगाई होत आहे. ग्रामीण भागात बँकेचे व्यवहार वारंवार ठप्प होत आहेत. बँकेतील नेटवर्कमुळे व्यवहार थांबत असल्याने ग्रामीण व शहरी भागातील शेतकऱ्यांंना व नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे.