पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या आंदोलनामुळे दगावली म्हैस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:27 AM2021-07-17T04:27:17+5:302021-07-17T04:27:17+5:30
या पशुपालकाने दुभती म्हैस गमावल्याने सुमारे ७५ हजारांचा फटका बसला आहे. पशुचिकित्सा व्यावसायी संघटनेने गत १५ जूनपासून विविध ...
या पशुपालकाने दुभती म्हैस गमावल्याने सुमारे ७५ हजारांचा फटका बसला आहे. पशुचिकित्सा व्यावसायी संघटनेने गत १५ जूनपासून विविध टप्प्यांत आंदोलन चालविले आहे. या आंदोलनाचा दुसरा टप्पा उलटूनही आणि तिसऱ्या टप्प्यात ‘कायद्याप्रमाणे काम’ करण्याचा इशारा देऊनही सरकार दखल घेत नसल्याने, १५ जुलैपासून राज्यभरात तिसऱ्या टप्प्यांतर्गत ‘कायद्याप्रमाणे काम’ करण्याचा पावित्रा पशुचिकित्सकांनी घेतला आहे. त्यामुळे चौकटी बाहेर जाऊन सेवा न देता, ‘कायद्याप्रमाणेच काम’ होत असल्याने, गांगलगाव येथे म्हशीला उपचाराची गरज असल्याचे कळूनही तिकडे कोणी फिरकले नाही. परिणामी, शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, १५ जूनपासून पहिल्या टप्प्यात बुलडाणा जिल्हा संघटनेने लसीकरण, सर्व प्रकारचे ऑनलाइन, मासिक, वार्षिक अहवाल देणे बंद व आढावा बैठकांना उपस्थिती बंद केली होती. आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात २५ जूनपासून राज्यातील विधानसभा, विधान परिषद सदस्य यांना निवदेन देत मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले. आता संघटनेने तिसऱ्या टप्प्यात हे आंदोलन तीव्र केले असून, कायद्याप्रमाणे काम करणे आणि सर्व शासकीय व्हॉट्सॲप ग्रुपमधून बाहेर पडले आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष डॉ.विनायक उबरहंडे, सरचिटणीस डॉ.प्रवीण निळे, तालुकाध्यक्ष ऐ.पी.डुकरे, डॉ.एस.जी.सुरडकर, डॉ.के.एन.शिंदे यांनी दिली आहे.
पशुपालकाचे ७५ हजारांचे नुकसान
चिखली तालुक्यातील गांगलगाव येथील भगवान राजाराम सावळे यांच्याकडील म्हशीची १५ जुलैला अचानकपणे तब्येत बिघडली असता, सावळे यांनी पशुधन अधिकारी व तालुका पशू अधिकारी यांना अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणीही त्यांचे फोन उचलले नाही. महत्प्रयासने अंत्री खेडेकर येथील पशुधन अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. पशुचिकित्सांचे आंदोलन सुरू असल्याने, चौकटीबाहेर जाऊन म्हशीवर उपचार करणे शक्य नव्हते. पर्यायाने म्हैस दगावली असून, यामुळे पशुपालकाचे सुमारे ७५ हजारांचे नुकसान झाले आहे.