खामगावात शिकस्त इमारत कोसळली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 02:47 PM2019-11-02T14:47:05+5:302019-11-02T14:47:19+5:30
स्नेहल शहा यांची जलालपुरा भागात दुमजली इमारत असून ही इमारत शिकस्त झालेली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : स्थानिक जलालपुरा भागातील शिकस्त झालेली दुमजली इमारत अचानक कोसळली. ही घटना गुरूवारी सायंकाळी घडली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही, मात्र बाजूच्या दोन घरांचे नुकसान झाले आहे.
स्नेहल शहा यांची जलालपुरा भागात दुमजली इमारत असून ही इमारत शिकस्त झालेली होती. या इमारतीत कुणीही राहत नसून शहा कुटुंब कोल्हापूर येथे राहते. या इमारतीत कुणीही राहत नसल्याने, सुदैवाने जिवीत हानी झाली नाही. मात्र, या इमारतीच्या लागून राहणारे अनिल चांडक व गणेश मानेकर यांच्या घराचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. इमारतीचा मलबा पडल्याने दोघांच्या बाथरुमची पडझड झाली आहे. घटनेची माहिती कळताच या ठिकाणी नागरिकांची गर्दी झाली होती. इमारत मालक शहा यांना शेजाऱ्यांनी फोनद्वारे सुचीत केले असल्याचे सांगण्यात आले.
शहरातील शिकस्त इमारतींच्या सर्वेक्षणाकडे दुर्लक्ष!
खामगाव शहरातील शिकस्त इमारतींच्या सर्वेक्षणाकडे नगर पालिका प्रशासनाकडून अक्षम्य दुर्लक्ष केल्या जात आहे. शहरात बºयाच शिकस्त मोडकळीस आलेल्या इमारतीत नागरिक राहतात तर काही इमारतीत दुकाने आहेत. अशा इमारतीत वास्तव्य करणे धोकादायक असून नागरिकांनी वेळीच सतर्कता दाखविणे गरजेचे आहे.