बुलडाणा : अत्यावश्यक सेवांची १३८३ वाहने सुसाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 11:45 AM2020-04-28T11:45:28+5:302020-04-28T11:46:12+5:30
विनापरवाना वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
योगेश देऊळकार
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : अत्यावश्यक सेवांच्या वाहतुकीसाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून ई-पासेस देण्यात आल्या आहेत. त्यानुसार संबंधित वाहनधारकास राज्यभर वाहतुकीस मुभा आहे. सध्या अत्यावश्यक सेवांची १ हजार ३८३ वाहने सुसाट धावत आहेत. विनापरवाना वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सध्या ‘लॉकडाउन’ लागू असल्याने अत्यावश्यक सेवांच्या वाहतुकीसाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून ई-पास उपलब्ध करून घेणे अनिवार्य आहे. ही पास मिळविण्यासाठी आॅनलाइन अर्ज करता येतो.
यासाठी वाहनधारकाकडे माल वाहतुकीचा परवाना, वाहनाचे इन्शुरन्स, वाहन चालकाचा परवाना वैध असणे आवश्यक आहे. जिल्ह्याभरातून अत्यावश्यक सेवांच्या पासकरीता अडीच हजारांपेक्षा जास्त अर्ज आले होते. यापैकी कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्याने अनेक अर्ज बाद झाले.
त्रुटींची पूर्तता केल्यानंतर त्यांना पासेस दिल्या जात आहेत. आतापर्यंत १ हजार ३८३ वाहनधारकांना पासेस देण्यात आल्या आहेत. यामुळे ही सर्व वाहने ‘लॉकडाउन’ कालावधीत जिल्ह्यासह राज्यभरातील रस्त्यावर सुसाट धावताना दिसून येत आहेत. दरम्यान, अत्यावश्यक सेवांच्या परवानगीच्या नावाखाली इतर वस्तुंची वाहतूक होत असल्याचे प्रकार काही ठिकाणी उघडकीस आले. अशा वाहनधारकांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
अत्यावश्यक सेवांच्या वाहतूकीकरीता निर्धारीत कालावधीसाठी वाहनधारकांना पासेस देण्यात आल्या आहेत. अर्ज करताना कालावधी नमूद करणे गरजेचे आहे. हा कालावधी एक महिन्यापेक्षा जास्त नसावा.
- अविनाश भोपळे,
मोटर वाहन निरीक्षक