बुलडाणा : खरिपासाठी १.६५ लाख मेट्रिक टन खतसाठा मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 12:02 PM2021-05-04T12:02:58+5:302021-05-04T12:03:16+5:30
Buldana Agriculture News : खरीप हंगामासाठी तयारी सुरू केली असून, जिल्ह्यासाठी १ लाख ६५ हजार मेट्रिक टन खतसाठा मंजूर करण्यात आला आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : खरीप हंगामाचे दिवस जवळ येत असल्याने शेतकरी शेती मशागतीच्या कामात व्यस्त आहे़ कृषी विभागाने खरीप हंगामासाठी तयारी सुरू केली असून, जिल्ह्यासाठी १ लाख ६५ हजार मेट्रिक टन खतसाठा मंजूर करण्यात आला आहे़ पुढील खरीप हंगामात शेतकऱ्यांना मुबलक बियाणे, खतांचा पुरवठा व्हावा. कुठलीही कमतरता पडू नये, त्याप्रकारे नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत दिल्या़
बोगस बियाणे निघाल्यास शेतकऱ्यांना उत्पन्नाची सरासरी गृहीत धरून आर्थिक मदत देण्यासाठी कंपन्यांकडून लेखी हमीपत्र घेण्याच्या सूचना करीत पालकमंत्री म्हणाले, बोगस बियाणे निघाल्यास कंपन्या तुटपुंजी मदत देतात. यावेळेस कृषी विभागाने बियाणे कंपन्यांकडून लेखी हमी घ्यावी, जर बोगस बियाणे निघाले व शेतकऱ्याचे नुकसान झाले तर, वार्षिक उत्पन्नाचे सरासरी गृहीत धरून कंपन्यांनी शेतकऱ्यांना मदत करावी. गुणनियंत्रणासंदर्भात विभागाने जिल्हा व तालुका स्तरावर भरारी पथकांची स्थापना करावी. या पथकांकडून खते, बियाणे व कीटकनाशक दुकानांची तपासणी करावी. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ३० मे पर्यंत ५० टक्के व १५ जूनपर्यंत ८० टक्के कृषी पतपुरवठा पूर्ण करण्यात यावा. बँकांनी दिलेल्या उद्दिष्टानुसार पीक कर्ज वितरण पूर्ण करावे. त्यासाठी सातत्याने आढावा घ्यावा, असे निर्देशही पालकमंत्री यांनी दिले.
ते पुढे म्हणाले, या वर्षातील पीक विमा मंजूर करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा. मका खरेदी करण्यासाठी नोंदणी सुरू करण्याकरिता प्रस्ताव पाठवावा. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची जनजागृती करून जास्तीत जास्त अर्ज प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करावे. यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांनीही यावेळी मार्गदर्शन केले़ याप्रसंगी ऑनलाईन पद्धतीने केंद्रीय ग्राम विकास समितीचे अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव, पंचायत राज समिती अध्यक्ष तथा आमदार डॉ. संजय रायमूलकर, आमदार डॉ. संजय कुटे, आमदार आकाश फुंडकर, आमदार राजेश एकडे, आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेताताई महाले, कृषी सभापती राजेंद्र पळसकर, आदी उपस्थित होते. एनआयसी केंद्रात जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, जिल्हा कृषी विकास अधिकारी अनिसा महाबळे उपस्थित होत्या.