बुलडाणा : कोटा येथून २९ विद्यार्थी परतले; दीड महिन्यापासून होते अडकून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 10:44 AM2020-05-03T10:44:06+5:302020-05-03T10:44:11+5:30
मुलांना समोर पाहताच पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले व त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडत प्रशासनाचे आभार मानले.
- योगेश देऊळकार
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : ‘लॉकडाउन’मुळे राजस्थानमधील कोटा येथे गेल्या दीड महिन्यापासून अडकलेले जिल्ह्यातील विद्यार्थी घरी येण्याची आस्थेने वाट पाहत होते. अखेर त्यांची प्रतीक्षा संपली अन् शुक्रवारी २९ विद्यार्थ्यांना प्रशासनाने एसटी बसद्वारे घरपोच सोडले. मुलांना समोर पाहताच पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले व त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडत प्रशासनाचे आभार मानले.
शिक्षणानिमित्त राजस्थानमधील कोटा येथे गेलेले महाराष्ट्रातील १ हजार ७६४विद्यार्थी ‘लॉकडाउन’मुळे अडकून पडले होते. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील २९ विद्यार्थ्यांचा समावेश होता. पालकांकडून या विद्यार्थ्यांना परत आणण्याची मागणी स्थानिक प्रशासनाकडे करण्यात येत होती. पालकांच्या मागणीनंतरही प्रशासनाकडून त्यांना परत आणण्याबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नव्हती. विद्यार्थ्यांची माहिती शासनाकडे सादर करण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. अखेर यासंदर्भात २९ एप्रिल रोजी वरीष्ठ पातळीवरून निर्णय होऊन विद्यार्थ्यांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून परत आणले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. अमरावती विभागातील १९० विद्यार्थ्यांसाठी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा आगारातून १० बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये अकोला, अमरावती जिल्ह्यासाठी चार व बुलडाणा, यवतमाळ, वाशिम जिल्ह्याकरीता सहा बसेस सोडण्यात आल्या होत्या. बुलडाणा जिल्ह्यातील २९ विद्यार्थ्यांना दोन बस (क्रमांक एम-एच- २० -बीएल - ३०३१ व एम-एच-१४ - बीएल - ४०४९) च्या माध्यमातून सोडण्यात आले. विद्यार्थी १ मे रोजी घरी पोहचले. मुलांना समोर पाहताच पालकांना गहिवरून आले.
तपासणी करून ‘होम क्वारंटीन’चा सल्ला
कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना एसटी बसच्या माध्यमातून सर्वप्रथम खामगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात सोडण्यात आले. याठिकाणी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सर्व विद्यार्थी निरोगी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले व १४ दिवस ‘होम क्वारंटीन’ठेवण्याचा सल्ला देण्यात आला. यानंतर सर्व विद्यार्थी खासगी वाहनाने आपल्या मूळगावी पोहचले.