बुलडाणा: वर्षभरात अपघातात ३१९ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 02:05 PM2020-02-19T14:05:22+5:302020-02-19T14:05:35+5:30

बुलडाणा जिल्ह्यात महिन्याकाठी सरासरी ४८ अपघातामध्ये २७ व्यक्ती मृत्यू पावत असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे.

Buldana: 319 people die in accidents during the year | बुलडाणा: वर्षभरात अपघातात ३१९ जणांचा मृत्यू

बुलडाणा: वर्षभरात अपघातात ३१९ जणांचा मृत्यू

Next

- सोहम घाडगे
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात गेल्या वर्षभरात रस्ते अपघाताने ३१९ व्यक्तींचे बळी घेतले असून २०१८ च्या तुलनेत अपघातामध्ये मृत्यू पावणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट होत आहे. बुलडाणा जिल्ह्यात महिन्याकाठी सरासरी ४८ अपघातामध्ये २७ व्यक्ती मृत्यू पावत असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे.
नववर्षापासून जिल्ह्यात हेल्मेटसक्तीची प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. तरीही गतवर्षीची अपघातांची संख्या व त्यात मृत्यू पावलेल्यांची संख्या ही जिल्ह्यात रस्ते प्रवास किती सुरक्षीत आहे, याचे वास्तव समोर आणणारा आहे. परिणामस्वरुप खासदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकांचेही गांभिर्य यामुळे वाढले आहे.
जिल्ह्यात ८५ किमी लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा, चिखली-मेहकर, खामगाव-देऊळगाव राजा, शेगाव ते पंढरपूर या दिंडी मार्गाचे बुलडाणा जिल्ह्यातील भागात सध्या वेगाने कामे चालू आहे. यामध्ये वाहतूक नियमांची पायमल्ली, वाहनांच्या तंदुरुस्तीचा अभाव, रस्ता दुरुस्तीदरम्यान कंत्राटदारांकडून न होणारे नियमांचे पालन, वाहन चालकांचा दोष यासह अन्य कारणामुळे जिल्ह्यात रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा हा जिल्ह्यातून गेलेला सुमारे ८५ किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. अलिकडील काळात हा महामार्ग मृत्यूचा सापळाच बनला आहे. या मार्गावर दररोज अपघात घडत आहे. १६ ब्लॅक स्पॉटचेही काम झाले आहे.

२०१८ च्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण वाढले
बुलडाणा जिल्ह्यातील रस्ते अपघातामध्ये २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. २०१८ मध्ये ३०४ व्यक्ती ६४८ अपघातामध्ये मृत्यू पावले होते. तर २०१९ मध्ये ५७२ अपघातामध्ये ३१९ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. सातत्याने बुलडाणा जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढत असून गेल्या दहा वर्षामध्ये खामगाव-देऊळगाव राजा हा रस्ता किलर ट्रॅक ठरला आहे. आता त्या पाठोपाठ मलकापूर ते खामगाव दरम्यानचा एनएच क्र. सहा किलर ट्रॅक ठरत आहे. त्यामुळे रस्ते दुरुस्तीसोबतच नव्याने होणारी रस्त्याची कामे तातडीने पूर्णत्वास नेण्याची गरज निर्माण झाली आहे.


राष्ट्रीय महामार्गावर झाले १६ अपघात
खामगाव: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गत वर्षभरात बाळापूर ते मलकापूर दरम्यान मोठ्या व छोट्या वाहनांचे मिळून १६ पेक्षा जास्त अपघात झाले आहेत. मलकापूरनजीक ट्रक-मालवाहूमध्ये अपघात होवून एकाच कुटूंबातील पाच जणांचा मृत्यू झाला होता. महामार्ग विस्तारीकरणाचे काम संथगतीने सुरु असल्याने अपघात घडत असल्याचे दिसून येते. २०१९ मधील सर्वात मोठा अपघात हा मलकापूरनजीक अनुराबाद येथे घडला होता. यामध्ये भरघाव कंटेनरने एका प्रवासी वाहतूक करणाºया वाहनास चिरडले होते. यामध्ये ठार झालेल्या १३ जणांपैकी ५ जण एकट्या अनुराबाद येथील असल्याने या गावातील नागरिकांना चांगलाच धक्का बसला होता. राष्ट्रीय महामार्गावरील टेंभूर्णा फाटा, वडनेर, सजनपूरी, अकोला बायपास, घाटपुरी या स्थळांना अपघातप्रवण स्थळ म्हणून ओळखले जाते.

Web Title: Buldana: 319 people die in accidents during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.