बुलडाणा : गतवर्षीच्या तुलनेत यंदा ५ टक्के अधिक पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 10:52 AM2020-08-01T10:52:28+5:302020-08-01T10:52:37+5:30
यंदा जिल्ह्यातील ९६ टक्के क्षेत्रावरील पिके ही उत्तम स्थितीत असल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.
बुलडाणा : गतवर्षीच्या तुलनेत जुन, जुलै महिन्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ५२ टक्के पाऊस झाल्याने जिल्ह्यातील पिकांची स्थिती चांगली आहे. दरम्यान, काही पिकांवर मावा, रस शोषणारी अळी आणि सेयाबीनवर चक्री भुंग्यांचा अवघ्या दोन ते तीन टक्के पिकांवर प्रादुर्भाव झाला आहे; मात्र कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. यंदा जून, जुलै महिन्यात टप्प्या टप्प्याने पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना मशागतीसाठीही वेळ मिळाल्याने पीक चांगले आहे. जिल्ह्यात गतवर्षी जून-जुलै महिन्यात झालेल्या पावसाच्या तुलनेत यंदा सरासरी ५.४५ टक्के अधिक पाऊस पडला असून, वार्षिक सरासरीच्या तो ५२ टक्के झाला आहे. पाऊस ठरविक खंड देत झाल्याने यंदा जिल्ह्यातील ९६ टक्के क्षेत्रावरील पिके ही उत्तम स्थितीत असल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.
विशेष म्हणजे यंदा उद्दिष्ठांपेक्षा ३० टक्के मक्याचा पेरा अधिक झाला आहे. तृणधान्याचा पेरा जिल्ह्यात ३५ हजार ५६८ हेक्टरवर झाला आहे. कडधान्याचा पेरा एक लाख सात हजार ४४ हेक्टरवर झाला आहे. यात उडीद पिकाचा पेरा सर्वाधिक आहे. तेलबियामध्ये बुलडाणा जिल्ह्यात सोयाबीनला पसंती दिल्या जाते. त्यानुषंगाने तेलबियांच्या उद्दिष्ठांपैकी सोयाबीनचा पेरा सर्वाधिक झाला असून, तीन लाख ६६ हजार ५५८ हेक्टरवर तो झाला आहे. तर कापसाचा पेरा एक लाख ९४ हजार ६४७ हेक्टरवर आहे. यंदा नेहमीच्या तुलनेत बुलडाणा जिल्ह्यात कपाशीचे पिक जोमदार असून, दोन ते तीन टक्के क्षेत्रारवरील कपाशीचे पीक हे फळधारणेच्या स्थितीत आले असून, अन्य ठिकाणी ते फुलावर आले आहे. खामगाव तालुक्यातील काही भागात गुलाबी बोंड अळी दिसून आली. शेतकºयांनी त्वरित त्याची माहिती कृषी विभागास दिल्यास वेळीच त्यावर नियंत्रण ठेवता येऊ शकते.
एकंदरीत बुलडाणा जिल्ह्यात पीकांची स्थिती जुन, जुलै महिन्यात उत्तम असल्याने जिल्ह्यात आशादायी चित्र निर्माण झाले आहे.
पाणी पुरेल का?
जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये सध्या ३२३ दलघमी पाणीसाठा असून, बुलडाणा जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई विचारात घेवून सरासरी ४० दलघमी पाणी आरक्षीत करण्यात येत असते. ते पाहता वर्तमान पाणी आरक्षण करण्याच्या दृष्टीने प्रकल्पामध्ये पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे. नऊ पालिका आणि १६९ गावांसाठी
प्रामुख्याने पाणी आरक्षीत करावे लागते. सध्या स्थितीत पुरेसे पाणी उपलब्ध आहे.
१४ हजार हेक्टर नुकसान
जुलै महिन्यात शेगाव, खामगाव तालुक्यातील आठ मंडळात अतिवृष्टी झाल्याने १४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. २०० हेक्टरवरील शेत जमीन खरडून गेली आहे. शेगाव तालुक्यात सर्वाधिक १२ हजार हेक्टरवर नुकसान झाले असून, खामगाव तालुक्यात १२४० हेक्टरवर नुकसान झाले. सहा तालुक्यात नुकसान झाले.
टप्प्या टप्प्याने पाऊस पडल्याने पिकांची स्थिती चांगली
जिल्ह्यात यंदा टप्प्या टप्प्याने पाऊस पडल्याने पिकांची स्थिती चांगली आहे. पिकांना आंतरमशागत करण्यासाठीही शेतकºयांना त्यामुळे वेळ मिळला. जिल्ह्यातून जून महिन्यात ११५ टक्के तर जुलै महिन्यात ११० टक्क्यांच्या आसपास पाऊस पडल्याने जिल्ह्यातील पिकांची स्थिती चांगली आहे. काही ठिकाणी अल्प प्रमाता किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्याबाबत शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी नरेंद्र नाईक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.