बुलडाणा : पहिल्याच दिवशी ५ टँकर दारूची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 11:42 AM2020-05-07T11:42:11+5:302020-05-07T11:42:21+5:30
बुलडाणा जिल्ह्यात पाच टँकर मद्याची विक्री झाली अर्थात २८ हजार २६९ लिटरच्या आसपास ही विक्री आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा/खामगाव : दीड महिन्यानंतर प्रथमच जिल्ह्यातील ९९ मद्यविक्रीची दुकाने उघडल्यानंतर पहाटेपासूनच या दुकानावर मद्य प्रेमींची दारू खरेदीसाठी झुंबड उडाली होती. दरम्यान, पहिल्याच दिवशी बुलडाणा जिल्ह्यात पाच टँकर मद्याची विक्री झाली अर्थात २८ हजार २६९ लिटरच्या आसपास ही विक्री आहे.
बुलडाणा जिल्ह्यात ७२ देशी, चार वाईन शॉप, २० बिअर शॉपी आणि विदेशी मद्याचे दोन होलसेल विक्रेते व देशी मद्याच्या विक्रीचा एक होलसेलर अशांची दुकाने नियमानुसार उघडण्यात आली होती. मात्र मद्य खरेदी करण्यासाठी उडालेली झुंबड पाहता फिडीकल डिस्टन्सींगचा फज्जा उडाल्याचे चित्र काही ठिकाणी पहावयास मिळाले. दरम्यान, सहा हजार लिटरचे एक टँकर गृहीत धरल्यास दीड महिन्यानंतर उघडलेल्या या मद्यांच्या दुकानातून जवळपास पाच टँकर मद्यविक्री झाली आहे.
मद्यविक्रीची दुकाने सुरू करण्याबाबत गेल्या काही दिवसापासून ओरड होती. त्यातच जिल्हा रेड झोनमधून आॅरेंज झोनमध्ये आला व केंद्र व राज्याच्या निर्देशानुसार आॅरेंज झोनमध्ये काही प्रमाणात शिथीलता देण्यात आल्याने सीलबंद मद्यविक्रीस प्रारंभ झाला. बुलडाण्यात दोन दिवस उशिराने ही विक्री सुरू झाली. त्यामुळे मद्याच्या दुकानासमोर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
मद्य खरेदी करणाऱ्यासाठी आलेल्यांपैकी काहींनी तर कापडी व वायरच्या पिशव्याच सोबत आणल्या होत्या. बुलडाण्यातील संगम चौकातील दुकान मात्र उघडले नाही. त्यामुळे अशा पिशव्या घेऊन आलेल्यांनी दुपारी दोन वाजेपर्यंत दुकान उघडण्याची वाट पाहली मात्र त्यांना शेवटी खाली हातच जावे लागले. खामगाव शहराबाहेरील सहा दारुची दुकाने सुरू झाली. एमआयडीसीमध्ये तीन, शेगाव रोडवर एक, तायडे कॉलनी व सजनपुरीत एक दुकान सुरू झाले होते. येथे मोठ्या प्रमाणावर मद्यप्रेमीँनी गर्दी केली होती.
बुलडाण्यात झाला अनेकांचा भ्रमनिराश
बुलडाणा शहरात एक बिअर शॉपी व देशी मद्यविक्रीचेच दुकान सहा एप्रिल रोजी उघडल्या गेले. त्यामुळे मर्यादीत स्वरुपात अनेकांना दारू मिळाली नाही. बुलडाणा शहरातील बसस्थानकानजीकच्या मद्यविक्रेत्याने मात्र पोलिस संरक्षण व सुरक्षेचा मुद्दा समोर करून सहा एप्रिल रोजी दारू विक्रीस नकार दिला. पोलिस प्रशासनानेही त्यांच्याशी चर्चा केली. मात्र जो पर्यंत शासनाने दिलेल्या सुचना व थर्मल स्कॅनिंग मशीनची उपलब्धता झाल्यानंतरच मद्यविक्रीची भूमिका घेतली. त्यामुळे जवळपास २०० मीटर पेक्षा जास्त अंतर गर्दी झालेल्या त्यांच्या दुकानावरील मद्यप्रेमींचा भ्रमनिराश झाला. दुपारी दोन वाजेपर्यंत या मद्याच्या दुकानासमोर मद्यप्रेमी ताटकळत उभे होते.