बुलडाणा: परराज्यातील ८३० मजुरांना प्रशासनाने पाठविले स्वगृही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 10:18 AM2020-05-09T10:18:26+5:302020-05-09T10:18:38+5:30
उत्तरप्रदेश व मध्यप्रदेश येथील एकूण ८३० मजूर बुलडाणा जिल्ह्यातून रवाना झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: लॉकडाउनमुळे जिल्ह्यात अडकलेले परराज्यातील कामगारांचे लोंढे आता स्वगृही जात आहेत. आतापर्यंत उत्तरप्रदेश व मध्यप्रदेश येथील एकूण ८३० मजूर बुलडाणा जिल्ह्यातून रवाना झाले आहेत. बिहार आणि झारखंडेचे मजूरही पुढील चार दिवसात पाठविण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात शासकीय निवारागृह, रस्ते काम, यासह खाजगी कामावर परराज्यातील अनेक मजूर होते. परंतू लॉकडाउनमुळे सर्व कामे बंद झाल्याने या मजूरांच्या हाताला काम राहिले नाही. सध्या राष्ट्रीय महामार्गाची कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यावरही परराज्यातील कामगार आहेत. परंतू कोरोना प्रादुर्भावाचा उद्रेक वाढतच असल्याने जिल्ह्यात असलेले परराज्यातील मजूर स्वगृही जात आहेत. काही मजूर यापूर्वी मिळेल त्या मार्गाने तर काहींनी पायी प्रवास करून स्थलांतर केले आहे. शासनाने रेल्वे, एसटी बसच्या माध्यमातून या मजूरांना स्वगृही पाठविण्याची मुभा दिली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. आतापर्यंत उत्तरप्रदेशचे ५१३, मध्यप्रदेशचे २४९ व प्रत्यक्ष भोपाळमध्ये राहणारे ६८ असे एकूण ८३९ मजूर रेल्वेने स्वगृही पाठविण्यात आले आहेत.
जिल्ह्यात अडकलेले बिहार व झारखंडे येथील कामगार स्वगृही पाठविण्यात येणार आहेत. जिल्ह्यात झारखंडचे २५० कामगार आहेत. बिहारची रेल्वे १० मे व झारखंडसाठी १२ मे रोजी रेल्वे आहे. या रेल्वेने जिल्ह्यात अडकलेल्या मजूरांना स्वगृही पाठविण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त अडकलेल्या मजूरांना स्वगृही जाण्याचे नियोजन प्रत्येक तहसील स्तरावरही करण्यात येत आहे.
दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील ५१ शिबीरामध्ये या मजुरांची राहण्याची व जेवनाची व्यवस्था करण्यात आलेली होती. जिल्ह्यातील ७० स्वयंसेवी संस्थांकडून त्यांना भोजन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनानही ५४६ परराज्यातील मजुरांची जेवनाची व्यवस्था केली होती. दरम्यान, येत्या काही दिवसात आणखी मजुरांची जाण्याची व्यवस्था केली जात आहे.