बुलडाणा : गारपिटीमुळे ३२ हजार ७00 हेक्टर क्षेत्र प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 01:28 AM2018-02-13T01:28:20+5:302018-02-13T01:29:08+5:30
बुलडाणा : गारपिटीमुळे जिल्ह्यातील ३२ हजार ७00 हेक्टर बागायत क्षेत्र प्रभावित झाल्याची प्राथमिक माहिती कृषी विभागाने दिली असून, या पृष्ठभूमिवर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल, कृषी व विमा कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक अपर जिल्हाधिकारी दुबे यांच्या प्रमुख उपस्थितीत १२ फेब्रुवारी रोजी पार पडली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकर्यांना नुकसानाची माहिती ४८ तासांच्या आत स्थानिक प्रशासनाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : गारपिटीमुळे जिल्ह्यातील ३२ हजार ७00 हेक्टर बागायत क्षेत्र प्रभावित झाल्याची प्राथमिक माहिती कृषी विभागाने दिली असून, या पृष्ठभूमिवर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल, कृषी व विमा कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक अपर जिल्हाधिकारी दुबे यांच्या प्रमुख उपस्थितीत १२ फेब्रुवारी रोजी पार पडली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकर्यांना नुकसानाची माहिती ४८ तासांच्या आत स्थानिक प्रशासनाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील ११ ही तालुक्यात रविवारी गारपिटीसह वादळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये जिल्ह्यातील संत्रा, मोसंबी, गहू, हरभरा, आंबा, कांदा, डाळिंब, द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत कृषी विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार गारपिटीमुळे जिल्ह्यातील ३२ हजार ७00 हेक्टर बागायत क्षेत्र प्रभावित झाले असून, जवळपास २७७ गावांना सर्वाधिक फटका बसला आहे. जिल्ह्यात गारपीटग्रस्तांच्या नुकसानाच्या पृष्ठभूमिवर कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी नुकसानाच्या पंचनाम्यासंदर्भात दिलेल्या निर्देशानुसार महसूल व कृषी विभागाच्या अधिकार्यांची तातडीची बैठक आयोजित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी बैठक बोलाविण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, कृषी उपसंचालक ढगे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रभाकर श्रोते, कृषी विकास अधिकारी मुकाडे व विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पीक विमा काढलेल्या शेतकर्यांनी झालेल्या नुकसानाबाबत ४८ तासांच्या आत स्थानिक प्रशासनास माहिती देण्याचे आवाहन करीत अपर जिल्हाधिकारी म्हणाले की, नुकसानग्रस्त शेतकर्यांनी तत्काळ कृषी, महसूल विभाग, बँक व विमा कंपनीच्या 0११-३३२0८४८५ या टोल फ्री क्रमांकावर यापैकी एका ठिकाणी माहिती द्यावी. विमा कंपनीने तालुकास्तरीय प्रतिनिधींना नुकसानाचे पंचनामे करून नुकसान भरपाई संबंधित शेतकर्याला तत्काळ अदा करावी. पीक विमा न काढलेल्या नुकसानग्रस्त शेतकर्यांचे नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्यात यावे. हे पंचनामे पूर्ण होताच नुकसान भरपाईसाठी शासन स्तरावर प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी केले.
चिखली तालुक्यात सर्वाधिक तर सिंदखेडराजा तालुक्यात सर्वात कमी नुकसान
रविवारी झालेल्या गारपिटीमध्ये सर्वाधिक नुकसान हे चिखली तालुक्यात झाले असून, तालुक्यातील ५७ गावातील हरभरा, गहू, कांदा, भाजीपाला व फळपिकाचे नुकसान झाले आहे. १४ हजार ७५९ हेक्टर क्षेत्र यामुळे प्रभावीत झाले आहे. खामगाव तालुक्यात ६६ गावात हरभरा, गहू, कांदा पिकाला फटका बसला असून, ८ हजार हेक्टरवरील रब्बी पिके नष्ट झाली आहेत. शेगाव तालुक्यात ३२९ हेक्टर, नांदुरा तालुक्यात ३00 हेक्टर, जळगाव जा.१३५, संग्रामपुरातील ६१ गावातील ६ हजार हेक्टर, मेहकरातील १ हजार ८७0, लोणारमधील १ हजार ८0, देऊळगावराजा तालुक्यात ६ गावातील १८९ हेक्टर आणि सिंदखेडराजामध्ये ११ गावात ३८ हेक्टर क्षेत्रावरील पिके नष्ट झाली आहेत. दुसरीकडे मोताळा आणि मलकापूर या दोन तालुक्यात तुरळक स्वरूपात पाऊस पडला असला, तरी प्रशासनाच्या आकडेवारीनुसार या तालुक्यात कुठलेही नुकसान झाले नसल्याचे दिसून येत आहे.
गारपीटमुळे ‘नेटशेड’चेही नुकसान
देऊळगावराजा तालुक्यात १८९ हेक्टर क्षेत्र प्रभावीत झाले असले तरी तालुक्यात जवळपास २७ नेटशेडला गारपिटीचा फटका बसलेला आहे. वरकरणी तालुक्यातील क्षेत्र कमी नुकसानग्रस्त वाटत असले तरी नेटशेडची संख्या पाहता येथील नुकसानीची रक्कम अधिक असल्याचे प्राथमिक स्तरावरील पाहणीत समोर येत आहे.
११ तालुके प्रभावित
पश्चिम वर्हाडातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत बुलडाणा जिल्ह्याचे गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. मलकापूर आणि मोताळा दोन तालुके वगळता जिल्हाभरात गारपीट व पावसामुळे रब्बीला फटका बसला आहे. बदललेल्या या हवामानामुळे आता वाचलेल्या पिकांना किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. पीक विमाधारक शेतकरी पंचनामे वा नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. झालेल्या नुकसानाचे तत्काळ पंचनामे करावे.
-प्रमोदसिंह दुबे,
अपर जिल्हाधिकारी, बुलडाणा.