बुलडाण्यात भरदिवसा घरफोडी; चार लाखांचा मुद्देमाल लंपास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 01:05 AM2018-04-15T01:05:01+5:302018-04-15T01:05:51+5:30
बुलडाणा: शहरातील सोळंकी ले- आऊटमध्ये भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत कपाटातील दीड लाख रुपये रोख व अडीच लाख रुपये किमतीचे आठ तोळे सोने लंपास केल्याची घटना शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: शहरातील सोळंकी ले- आऊटमध्ये भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत कपाटातील दीड लाख रुपये रोख व अडीच लाख रुपये किमतीचे आठ तोळे सोने लंपास केल्याची घटना शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सायंकाळी ७ वाजता पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, ठसे तज्ज्ञांनी घरातील ठसे घेतले असून, उपविभागीय पोलीस अधिकारी बी. बी. महामुनी यांनीही घटनास्थळी भेट दिली आहे.
बुलडाणा येथील श्री. शिवाजी विद्यालयामध्ये पंढरीनाथ वाघ हे कार्यरत आहेत. एमसीव्हीसीला ते शिकवतात. त्यांच्या मुलीचा ४ मे रोजी विवाह ठरला आहे. त्यानिमित्ताने ते शनिवारी बुलडाणा शहरातील एका भागात नातेवाइकाकडे गडंगनेरासाठी मुलगा, पत्नीसह गेले होते. दरम्यान, यावेळी त्यांच्या घरी कोणी नव्हते. त्यामुळे त्यांनी घराला कुलूप लावून घेतले होते.
दरम्यान, दुपारची हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. सोबतच घरातील कपाटाच्या लॉकरचे लॉक तोडून त्यातील आठ तोळे सोने आणि दीड लाख रुपये रोख लंपास केली. यामध्ये दोन तोळ्य़ाची पोत, सोन्याचा गोफ, तीन अंगठय़ा, कानातले पाच जोड मण्याची एक माळ असे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहे. वृत्त लिहीपर्यंत याप्रकरणी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
दरम्यान, बुलडाणा शहरात भरदिवसा अशी धाडसी चोरी होण्याचा हा अलीकडील काळातील पहिलाच प्रकार म्हणावा लागले. त्यामुळे बुलडाणेकर सध्या चांगलेच धास्तावले असून, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची ओरड होत आहे.