बुलडाणा : चार टक्के विद्यार्थ्यांचीच वसतिगृह, आश्रमशाळेत हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 11:05 AM2020-12-13T11:05:39+5:302020-12-13T11:07:35+5:30

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कायम असल्याने मुलांना आश्रमशाळा, वसतिगृह व निवासी शाळेत पाठविण्याची पालकांमध्ये भीती आहे.

Buldana: Attendance of hostel, ashram school of only four percent students | बुलडाणा : चार टक्के विद्यार्थ्यांचीच वसतिगृह, आश्रमशाळेत हजेरी

बुलडाणा : चार टक्के विद्यार्थ्यांचीच वसतिगृह, आश्रमशाळेत हजेरी

googlenewsNext
ठळक मुद्देअवघ्या चार टक्केच विद्यार्थ्यांची सध्या उपस्थिती राहत आहे.अनेक अडचणी आश्रमशाळेची पाठ सोडत नसल्याचे चित्र आहे. 

 लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यातील २५ वसतिगृहे व आश्रमशाळा सुरू झालेल्या आहेत; परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कायम असल्याने मुलांना आश्रमशाळा, वसतिगृह व निवासी शाळेत पाठविण्याची पालकांमध्ये भीती आहे. एकूण विद्यार्थ्यांपैकी अवघ्या चार टक्केच विद्यार्थ्यांची सध्या उपस्थिती राहत आहे. अनेक अडचणी आश्रमशाळेची पाठ सोडत नसल्याचे चित्र आहे. 
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा-महाविद्यालय सुरू होण्याची विद्यार्थ्यांसह पालकांना प्रतीक्षा होती. दरम्यान, इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग राज्य शासनाच्या निर्देशानुसार सुरू करण्यात आले आहेत. 
त्यामध्ये शासकीय वसतिगृह, शासकीय निवासी शाळा आणि विजाभज आश्रमशाळा सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात एकूण ४६ संस्थांपैकी २५ संस्था सुरू करण्यात आलेल्या आहेत; परंतु कोरोना विषाणू संसर्गामुळे वसतिगृह, निवासी शाळा व आश्रमशाळांमध्ये पाल्यांना पाठविण्यासाठी अनेक पालक तयार नाहीत. 
राज्य शासनाच्या आदेशानुसार मुलांना शाळेत पाठविण्यापूर्वी पालकांचे संमतिपत्र घेणे आवश्यक आहे. त्यामध्ये बहुतांश पालकांनी संमतिपत्रामध्ये नकार दर्शविला आहे. 
जिल्ह्यात आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये एकूण २ हजार ३८९ विद्यार्थी संख्या आहे. त्यापैकी केवळ १११ विद्यार्थ्यांचीच उपस्थिती राहत आहे. 
यातील काही शाळा ह्या कोविड सेंटर असल्याने त्या आतापर्यंत सुरू करण्यात आलेल्या नाहीत. ज्या शाळा सुरू झाल्या त्यामध्ये पाल्यांना पाठविण्यास पालक तयार नसल्याचे चित्र आहे. अद्यापही येथील यंत्रणा सुरळीत झाली नसल्याचे निदर्शनास येत आहे.


आश्रमशाळांसमोर अडचणी
पालकांकडून संमतिपत्र घेण्यात येत असल्याने अनेक पालक मुलांना आश्रमशाळेत पाठविण्यास तयार होत नसल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील आश्रमशाळेत ७९४ विद्यार्थ्यांपैकी केवळ ७१ विद्यार्थी उपस्थित राहत आहेत. ७२३ पालकांनी आश्रमशाळेत पाल्यांना पाठविण्यास संमती दिलेली नाही. त्यामुळे आश्रमशाळांसमोर अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत.

जिल्ह्यातील शासकीय वसतिगृह, निवासी शाळा, विजाभज आश्रमशाळा शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचेच वर्ग सुरू आहेत. ज्या शाळा, वसतिगृह  कोविड सेंटर अलगीकरण कक्षासाठी आहेत, त्या बंदच आहेत. त्यासाठी संबंधित तहसील कार्यालयांशी संपर्क साधत आहोत. 
- अनिता राठोड,  
सहायक आयुक्त, समाजकल्याण.

Web Title: Buldana: Attendance of hostel, ashram school of only four percent students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.