बुलडाण्यातील स्वयंचलित हवामान केंद्र कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:23 AM2021-07-09T04:23:00+5:302021-07-09T04:23:00+5:30
३० जून रोजी पुणे येथील तंत्रज्ञांच्या पथकाने या स्वयंचलित हवामान केंद्राचे सेंसर्स बसवल्यानंतर हे हवामान केंद्र कार्यान्वित झाले आहे. ...
३० जून रोजी पुणे येथील तंत्रज्ञांच्या पथकाने या स्वयंचलित हवामान केंद्राचे सेंसर्स बसवल्यानंतर हे हवामान केंद्र कार्यान्वित झाले आहे. मधल्या काळातील लॉकडाऊनमुळे हे हवामान केंद्र कार्यान्वित होण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. पण आता जिल्ह्यातील हवामानाची अद्ययावत माहिती याद्वारे मिळणार आहे. भारतीय हवामान खात्याने बुलडाणा येथे हे केंद्र सुरू करण्याबाबत प्रस्तावित केले होते. त्यानुषंगाने येत्या काही दिवसात हवामान खात्याचे एक पथक पुन्हा सर्वेक्षणासाठी बुलडाण्यात येणार असून त्यानंतर खऱ्या अर्थाने थेट शेतकऱ्यांना या केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध होणारी माहिती जिल्हा कृषी हवामान केंद्राद्वारे दिली जाणार आहे. वर्तमान स्थितीत जिल्ह्यात जवळपास १८ हजार शेतकऱ्यांना व्हॉट्सॲप, मोबाइल टेक्स मॅसेजद्वारे हवामानाचा अंदाज पाठविण्यात येत आहे.
देशातील १९६ जिल्हे हे हवामान बदलाबाबत संवेदनशील आहेत. त्यामध्ये बुलडाण्याचाही समावेश आहे. दुसरीकडे राज्यात अशा केंद्रांची पालघर, उस्मानाबाद, अैारंगाबाद, सोलापूर, नंदुरबार, बुलडाणा, वाशिम, नागपूर, भंडारा, गडचिरोली येथेही स्थापना करण्यात आली असून, प्रायोगिक तत्त्वावर ते कार्यान्वित झालेले आहेत.
--आठ घटकांची माहिती मिळेल--
हे केंद्र कार्यान्वित झाल्यामुळे तापमान, वाऱ्याचा वेग, दिशा, पर्जन्यमान, हवेतील आर्द्रता, सूर्यप्रकाशाचा काळ, प्रखरता, मातीतील ओलाव्याची माहिती स्वयंचलित पद्धतीने मिळण्यास मदत होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळीच हवामानाचा अंदाज व कृषीविषयक सल्ला देणे सोपे होईल. सुमारे १० लाख ५० हजार रुपये खर्च करून हे केंद्र उभारण्यात आले असून, त्याच्या देखभाल, दुरुस्तीकडे हवामान खातेच लक्ष देणार आहे.