बुलडाणा शहरातील रस्ते हरवले खड्ड्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 03:30 PM2019-07-09T15:30:49+5:302019-07-09T15:30:57+5:30
बुलडाणा : शहरातील प्रमुख मार्गासह अंतर्गत रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडल्याने नागरिकांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागत आहे.
- सोहम घाडगे
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शहरातील प्रमुख मार्गासह अंतर्गत रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडल्याने नागरिकांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागत आहे. पालिका प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे. रस्ते खड्ड्यात हरविल्याने बुलडाणेकरांमधून रोष व्यक्त होत आहे.
जिल्ह्याचे ठिकाण असलेले बुलडाणा शहर सध्या खड्ड्यांच्या दुखण्यामुळे त्रस्त झाले आहे. शहरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यातून मार्ग काढतांना दुचाकी व चारचाकी वाहनांच्या चालकांना कसरत करावी लागत आहे. सर्वच वर्दळीच्या रस्त्यांवर हे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागत आहे. खड्ड्यांची दुरुस्ती करण्याबाबत अनेकदा पालिका प्रशासनाकडे मागणी करण्यात आली. मात्र केवळ बघ्याची भूमिका घेतली जात आहे. खड्ड्यांच्या दुरुस्तीकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले आहे.
बुलडाणा शहरात नोकरदार वर्ग मोठ्या संख्येने राहतो. सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारीही बुलडाणा येथे कायमस्वरुपी वास्तव्य करण्यास पसंती देतात. सर्वसामान्य माणसाला चांगले रस्ते, २४ तास विज व पाणी हवे असते. बाकी गोष्टींशी त्यांना फारसे घेणे नसते. किमान या तीन गरजांकडे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतात. परंतू सध्या रस्त्यांची झालेली दुरवस्था पाहता बुलडाणेकरांमधून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. शांत व सुंदर शहर अशी बुलडाण्याची ओळख आहे. मात्र त्या तुलनेत शहरात सोयी सुविधा उपलब्ध होत नसल्याने नागरिकांचा हिरमोड होत आहे.
शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली आहे. एक खड्डा चुकवला तर दुसरा पुढे आहेच. त्यामुळे खड्डे चुकवावे तरी किती असा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे. पावसाळा सुरु असल्यामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचते. साचलेल्या पाण्यामुळे खड्डा दिसत नाही. वाहने खड्ड्यात गेल्याने अपघात होऊ शकतात.
असे रस्ते, असे खड्डे
शहरातील महत्वाच्या मार्गांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. महात्मा फुले शाळेसमोर रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. खड्ड्यात पाणी साचल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे. खड्डे त्वरित दुरुस्त करावे, अशी मागणी नगरसेविका सुभद्रा इंगळे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.
बसस्थानक ते चिंचोले चौक, गजानन महाराज मंदिर रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. संपूर्ण रस्त्यावर खड्ड्यांची चादर पसरलेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाजवळील रस्ता खड्ड्यात बुडाला आहे. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची डागडूजी केलेली नाही. खड्डे दुरुस्त केले नसल्याने वाहन चालवतांना अडचणी येतात.
डीएसडी मॉलपासून चैतन्यवाडीकडे जाणाºया रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. रस्त्याची दुरवस्था झाली असून दुरुस्तीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. बाजार गल्लीतील रस्त्यावरही खड्डे पडले असून दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे.
तहसील - संगम चौक रस्त्याचे ग्रहण सुटेना
तहसील कार्यालय ते संगम चौक हा कायम वर्दळीचा रस्ता आहे. दररोज हजारो वाहने या रस्त्यावरुन ये- जा करतात. परंतू या रस्त्याला खड्ड्यांचे ग्रहण लागलेले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे ग्रहण सुटलेले नाही. संपूर्ण रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत.जिल्हा सामान्य रुग्णालयात जाण्यासाठी हाच रस्ता आहे. बाहेरगावावरुन येणारे रुग्ण याच मार्गाने दवाखान्यात जातात. रस्त्यावरील खड्ड्यांमधून मार्ग काढत त्यांना जावे लागते. तहसील कार्यालयात विविध दाखले काढण्यासाठी आलेल्या नागरिकांना याच मार्गावरुन जावे लागते. विशेष म्हणजे खासदार प्रतापराव जाधव यांचे संपर्क कार्यालय याच रस्त्यावर आहे. माजी आमदार विजयराज शिंदे यांचेही संपर्क कार्यालय रस्त्याला लागूनच आहे. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय राठोड यांचे निवासस्थान याच रस्त्यावर आहे. त्यांच्या घरासमोर तर रस्त्यावर भले मोठे खड्डे पडलेले आहे. लोकप्रतिनिधी, नेते, पुढारी यांनी लक्ष घालून रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. कायम वर्दळीचा तहसील चौक ते संगम चौक रस्ता आगामी काळात गुळगुळीत व्हावा, अशी अपेक्षा सर्वसामान्य बुलडाणेकर व्यक्त करीत आहेत.