बुलडाणा : ‘कोरोना’ विषाणू संसर्गाचा आता ग्रामीण भागात विळखा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 11:00 AM2020-06-02T11:00:31+5:302020-06-02T11:01:01+5:30
सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा, मलकापूरनजीकचे धरणगाव, मोताळा तालुक्यातील शेलापूर याठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण आता वाढत असून ग्रामीण भागातही संसर्गाचा विळखा वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा, मलकापूरनजीकचे धरणगाव, मोताळा तालुक्यातील शेलापूर याठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी ४६ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ३८ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून आठ अहवाल रविवारी रात्री व सकाळी सकाळी पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव आलेल्या अहवालांमध्ये चार महिला व चार पुरूष आहेत. या अहवालांमध्ये मलकापूर येथील चार, धरणगांव येथील एक, शेलापूर खुर्द येथील दोन व साखरखेर्डा येथील एक रुग्ण आहे. ग्रामीण भागात कोरोचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.
१४ अहवाल प्रतिक्षेत
कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी आता सुरू झाली आहे. १ जुन रोजी ४६ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ३८ अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. सध्या अहवालाच्या प्रतिक्षेत १४ नमुने आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल १२७४ आले आहेत.