बुलडाणा : देव्हारी ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 01:17 PM2019-02-25T13:17:27+5:302019-02-25T13:17:34+5:30
बुलडाणा: जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १५ ते २० किमी अंतरावर असलेल्या वनग्राम देव्हारी येथील ग्रामस्थांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १५ ते २० किमी अंतरावर असलेल्या वनग्राम देव्हारी येथील ग्रामस्थांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या ६० वर्षापासून या गावाला जाण्यासाठी साधा रस्ताही नाही. त्यामुळे त्रस्त ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांना एक निवेदनही ग्रामस्थांनी दिले आहे. या गावात रोजगार नाही, आरोग्य सुविधा नाहीत. शैक्षणिक सुविधांचाही येथे अभाव आहे. ग्रामस्थांनी आमदार, खासदारांना वेळोवेळी अनुषंगीक विषयान्वये निवेदने दिली आहेत. मात्र राजकीय व्यक्तींनीही येथील समस्या निराकरणासाठी पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळे त्रस्त ग्रामस्थ शेवटी या पवित्र्यात आले आहे. त्यात शासकीय योजनांचा येथील शेतकर्यांनाही लाभ मिळत नाही. शेतकर्यांना मिळालेल्या वर्ग दोन च्या जमीनीच्या ७/१२ ची वाटणीपत्रक (पोटहिस्से) करण्यासाठी महसूल विभागाकडून परवानगी मिळावी जेणेकरून शेतकरी शासकीय योजनाचा लाभ घेऊ शकतील ही या ग्रामस्थांची प्रमुख मागणी आहे.
आरोग्य सुविधा नसल्याने गर्भवती महिलांना रस्ता नसलेल्या या गावातून रुग्णालयात नेतांना मोठी अडचण आहे. या असुविधांअभावी यापूर्वी येथे काही महिलांचा मृत्यू सुद्धा झाला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. परिणामी जो पर्यंत येथील ग्रामस्थांना पायाभूत सुविधा उपलब्ध होत नाहीत तो पर्यंत लोकसभा निवडणुकीवर ग्रामस्थांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासंदर्भात माजी सरपंच साधना बुद्धेश्वर हिवाळे, आम्रपाली श्रीकृष्ण हिवाळे, अॅड. जीवन गवई, वंदना झीने, दिलीप पवार, बुद्धेश्वर हिवाळे, राजेंद्र जाधव, ऋषीकेश हिवाळे, धिरज हिवाळे यांच्यासह अन्य नागरिकांनी हे निवेदनन दिले आहे. प्रशासनाने प्रशासनाने येथे पायाभूत सविधा उपलब्ध कराव्यात अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
(प्रतिनिधी)