बुलडाणा: घरी शौचालय असणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 02:53 PM2018-01-15T14:53:48+5:302018-01-15T14:57:54+5:30
जानेफळ (बुलडाणा): घरी शौचालय बांधण्यासाठी पाल्यांनी आपल्या आई वडीलांकडे हट्ट धरावा आणि संपूर्ण गाव हागणदारीमुक्त व्हावे यासाठी येथील ग्रामसेवकाने अभिनव उपक्रम राबवित घरी शौचालय असणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
जानेफळ (बुलडाणा): घरी शौचालय बांधण्यासाठी पाल्यांनी आपल्या आई वडीलांकडे हट्ट धरावा आणि संपूर्ण गाव हागणदारीमुक्त व्हावे यासाठी येथील ग्रामसेवकाने अभिनव उपक्रम राबवित घरी शौचालय असणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. यावेळी ज्यांच्याघरी शौचालय नाही, अशा विद्यार्थ्यांना आपल्या आई वडीलांकडे शौचालय बांधण्याचा हट्ट धरण्यासाठी शौचालय घरी असण्याचे फायदे पटवून दिले.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौच्छालय बांधकामाचे उद्दिष्ट फेब्रुवारी २०१८ अखेरपर्यंत पुर्ण होवून गाव १०० टक्के हागणदारीमुक्त व्हावे यासाठी येथील ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी डी.टी.तांबारे यांनी घरी शौचालय असणाºया विद्यार्थ्यांना स्वखर्चातून शैक्षणिक साहित्याचे वाटप केले असून त्यांच्या या अभिनव उपक्रमाचे कौतूक होत आहे. याबाबत जिल्हा परिषद मराठी पूर्व माध्यमिक शाळेत शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात मेहकर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमाकांत पवार, सहाय्यक गटविकास अधिकारी अशोक सानप आदींच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येवून ज्यांच्याघरी शौचालय नाही अशा विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडीलांकडे शौचालय बांधण्यासाठी हट्ट धरावा आणि त्यांना प्रवृत्त करावे व तुमच्या घरी शौचालय बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सुध्दा मोठे बक्षीस देण्यात येईल, असे यावेळी ग्रामविकास अधिकारी डी.टी.तांबारे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच घरी शौचालय असण्याचे फायदे विद्यार्थ्यांना पटवून दिले. यावेळी विस्तार अधिकारी राजपूत, ग्रामसेवक निकम, झाल्टे, बचाटे, गवई, शिंदे, नवनिर्वाचित सरपंच विश्वनाथ हिवराळे, अमर राऊत, सैय्यद जाबीर, श्रीकृष्ण काकडे आदींसह गावातील नागरीक, मुख्याध्यापक पगारे तथा शिक्षक उपस्थित होते. (वार्ताहर)
घरोघरी पोहचला शौचालय बांधण्याचा संदेश
जानेफळ येथील ३५७ लोकांकडे अद्यापही शौच्छालय बांधण्यात आलेले नसल्याने अधिकाºयांच्या पथकासह ग्रामविकास अधिकारी तांबारे, ग्रा.पं. कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांनी ९ जानवोरी रोजी संपूर्ण जानेफळ गावात फिरून शौचालय बांधण्याचा संदेश दिला. नवनिर्वाचित सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनीसुध्दा या पथकाला सहकार्य केले.