दोन महिन्यात बुलडाणा जिल्ह्यात पडला २१८ टक्के अवकाळी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 01:29 PM2019-11-10T13:29:41+5:302019-11-10T13:30:05+5:30
यंदा एकट्या आॅक्टोबर महिन्यात अवघ्या नऊ दिवसात तब्बल १००.२२ मिमी पाऊस पडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात पडलेल्या परतीच्या व अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात प्रथमच खरीपाचे मोठे नुकसान केले आहे. दरम्यान, हे दोन्ही महिने मिळून जिल्ह्यात सरासरी २१८ टक्के अवकाळी पाऊस पडला आहे. त्यामुळेच खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर येत आहे.
जिल्ह्यात साधारणत: आॅक्टोबर मध्ये ४४.८४ मिमी तर नोव्हेंबरमध्ये २३.२२ मिमी पाऊस पडत असतो. मात्र यंदा एकट्या आॅक्टोबर महिन्यात अवघ्या नऊ दिवसात तब्बल १००.२२ मिमी पाऊस पडला. त्याची टक्केवारी ही २२३.५१ मिमी होती. दुसरीकडे नोव्हेंबर महिन्यात ४७.९७ मिमी पावसाची नोंद झाली. त्याची टक्केवारी ही २०६.५९ टक्के आहे. विशेष म्हणजे अवघ्या चार नोव्हेंबरपर्यंत हा पाऊस पडला. त्यातही जिल्ह्यातील आठ मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली होती. त्यामुळे खरीपाचे हाताशी आलेले व शेतात गंजी लावून ठेवलेले पीक नेस्तनाबूत झाले. त्यामुळे बाजार समित्यांमध्येही मालाची आवक कमी झाली असून एकट्या आॅक्टोबर महिन्यात बाजार समित्यांमधील आर्थिक उलाढाल ही ८२ कोटींनी घसरली आहे. त्यावरून या नुकसानाची व्याप्ती निदर्शनास यावी.
आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यातील एकंदरीत पावसाची नोंद पाहता १४८.१९ मिमी पावसाची नोंद झाली असून त्याची टक्केवारीत तो २१८ टक्के आहे. सरासरी ११ दिवसात हा अवकाळी पाऊस पडला. बुलडाणा तालुक्यात तब्बल १६ दिवस हा पाऊस बरसला तर चिखलीमध्ये १५ दिवस तो बरसत होता. एकट्या चिखली तालुक्यात नेहमीच्या तुलनेत ३१७ टक्के अवकाळी पाऊस बरसला.
परतीच्या व अवकाळी पावसाची जिल्ह्यात पडणाऱ्या वार्षिक पावसाच्या सरासरीशी तुलना केली असता ती २२.१९ टक्के येते. बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरी ६६७.८ मिमी पाऊस पडतो. यंदा मात्र तो अधिक पडला. चार नोव्हेंबर पर्यंंतची पावसाची आकडेवारी पाहता वार्षिक सरासरीच्या हा पाऊस २२.१९ टक्के आहे. अर्थात सरासरी १४८.१९ मिमी ऐवढी या पावसाची नोंद झाली आहे.
नोव्हेंबरमध्ये चांधई, मेहकर, देऊळगाव माळी, बिबी, मलकापूर पांग्रा, दुसरबीड, सोनुशी, शेंदुर्जन या आठ मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे.