बुलडाणा जिल्ह्यात ६५0 गावात पाणीटंचाईचे सावट!
By admin | Published: February 22, 2017 02:36 AM2017-02-22T02:36:08+5:302017-02-22T02:36:08+5:30
उन्हाळा सुरु होण्याआधीच गंभीर स्थिती
नीलेश शहाकार
बुलडाणा, दि. २१- जिल्हा प्रशासनाने २0१६-१७ साठी पाणीटंचाई निवारण आराखडा तयार केला असून जिल्ह्यात ६५0 गावात संभाव्य पाणीटंचाई घोषित केली आहेत.
गत वर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे बर्याच प्रकल्पातील जलपातळीत मोठी वाढ जलसंकट काही प्रमाणात टळले होते. शिवाय ग्रामीण भागात पाणीपुरवठा करणार्या टँकरच्या संख्येतही घट झाली.
जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे पाणीपातळी वाढविण्यात प्रशासनाला यश आले. मात्र, ऑक्टोबरनंतर अपेक्षीत पाऊस न झाल्याने जलसाठय़ातील पाणीपातळी खालावली आहे. उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ आराखडा तयार केला. त्यानुसार ६५0 गावात संभाव्य पाणीटंचाई घोषित करुन उपाययोजना आखण्यात आल्या आहे. देऊळगावराजा, मेहकर, लोणार, सिंदखेडराजा, शेगाव व जळगाव जामोद सहा तालुक्यातील सर्वाधिक गावे पाणीटंचाईग्रस्त घोषित करण्यात आली आहे.
योजनांचे काम कासव गतीने
पाणीटंचाई निवारणार्थ प्रशासनाकडून तयार करण्यात आलेला आराखडा ऑक्टोबर २0१६ ते जून २0१७ या कालर्मयादेसाठी तयार करण्यात आला आहे. यात नवीन विंधन विहिरी, कूपनलिका, नळयोजना विशेष दुरुस्ती, विंधन विहिरीची दुरुस्ती या योजनांची अंमलबजावणी ऑक्टोबरपासूनच झाली, तर उन्हाळ्यात निर्माण होणार्या पाणीटंचाईशी दोन हात करता येतील. मात्र, या योजनांचे काम कासव गतीने होत असून आतापर्यंत केवळ चार गावांमध्ये योजनांची कामे पूर्ण झाली आहेत.
सहा तालुक्यांत सर्वाधिक गावे टंचाईग्रस्त
४पाच वर्षांपासून जिल्ह्यातील बरीच गावे कायमस्वरुपी पाणीटंचाईची छळ सोसत आहेत. यावर्षीही देऊळगाव राजा, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, शेगाव व जळगाव जामोद या सहा तालुक्यांतील सर्वाधिक गावे पाणीटंचाईग्रस्त घोषित करण्यात आली आहेत.