बुलडाणा जिल्ह्यात ७४ टक्के शाळा प्रगत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 02:35 PM2019-08-19T14:35:07+5:302019-08-19T14:35:22+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील एकूण शाळांपैकी ७४ टक्के शाळा प्रगत दाखवण्यात आल्या आहेत.

Buldana district up to 74% school advanced! | बुलडाणा जिल्ह्यात ७४ टक्के शाळा प्रगत!

बुलडाणा जिल्ह्यात ७४ टक्के शाळा प्रगत!

Next

- ब्रम्हानंद जाधव 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी हातभार लागत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७४ टक्के शाळा प्रगत झाल्या आहेत. यातूनच गुणवत्तापूर्ण शिक्षणावरही भर दिल्या जात आहे.
वाचन, लेखन, संख्या ज्ञान आणि संख्यांवरील क्रिया या क्षमतांची परिपूर्ण तयारी झाल्यास ज्ञानग्रहण आणि आकलनाचा मार्ग सुलभ होतो. त्याकडे दुर्लक्ष झाल्यास शैक्षणिक गुणवत्ता विकासाचा पाया कच्चा राहतो. प्रत्येक विद्यार्थ्याची पायाभूत संपादणुकीची नियमित पडताळणी करून शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम २०१५-१६ पासून राज्यात सुरू करण्यात आला आहे. त्याअंतर्गत सर्व माध्यमांच्या शाळांमधून इयत्ता पहिली ते आठवीतील सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा व गणित विषयाच्या शैक्षणिक प्रगती चाचण्या घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संपादणुकीची खात्री शैक्षणिक प्रगती चाचणीद्वारे करण्यात आली. सुरुवातीच्या टप्प्यात जिल्ह्यातील ७५८ शाळाच प्रगत शाळांमध्ये होत्या. आता जिल्ह्यातील १ हजार १५८ शाळा प्रगत झाल्या आहेत. २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी प्रगत शैक्षणिक कार्यक्रम राबविण्याच्या हालचाली सुरू आहेत.


अप्रगत शाळांकडे विशेष लक्ष
जिल्ह्यातील एकूण शाळांपैकी ७४ टक्के शाळा प्रगत दाखवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये उर्वरित २६ टक्के शाळांमध्ये ३९९ शाळांचा समावेश आहे. ३९९ शाळा अप्रगतमध्ये मोडतात. त्यामुळे या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये अप्रगत शाळा प्रगतीच्या वाटेवर आणण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून विशेष लक्ष दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


आता इंग्रजी भाषा समृद्धीकरण
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनासाठी २०१९-२० या वर्षात इंग्रजी भाषा विषय समृद्धीकरणावर भर देण्यात येत आहे. राज्यातील ६ हजार १७० समूह साधन केंद्रांना (केंद्रीय शाळा) इंग्रजी भाषा विषय समृद्धीकरणासाठी पूरक शैक्षणिक साहित्य संचन पुनर्प्रत्ययी आदेशाने उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण विभागाने नव्या सत्रातील शाळा सुरू होण्यापूर्वीच मान्यता दिली. विद्याथ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविण्यासाठी २०१९-२० या वर्षात १० कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.

जिल्ह्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत पायाभूत चाचण्या, गुणवत्ता वाढीवर भर देण्यात येत आहे. यातून अनेक शाळा आयएसओ, डिजिटलही झाल्या. यंदा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम शाळेत राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रही जिल्ह्यात उभारण्यात येत आहेत.
- डॉ. श्रीराम पानझाडे,
शिक्षणाधिकारी, बुलडाणा.

Web Title: Buldana district up to 74% school advanced!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.