बुलडाणा जिल्हा पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 12:28 PM2021-02-22T12:28:39+5:302021-02-22T12:28:46+5:30
Buldhana News बुलडाणा जिल्ह्याची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने होत असल्याची भीती व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्याची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने होत असल्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, विभागीय आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानंतर बुलडाणा जिल्ह्यातील व्यापारी प्रतिष्ठाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंतच सुरू राहणार असून, शासकीय तथा खासगी कार्यालयांमध्ये एकूण संख्येच्या तुलनेत १५ टक्के किंवा १५ व्यक्ती यापैकी जी संख्या जास्त असेल एवढी उपस्थिती गृहीत धरून कार्यालये सुरू ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी निर्गमित केला आहे.
एक प्रकारे बुलडाणा जिल्ह्यात आता मिनी लॉकडाऊनचा प्रकार पाहण्यास मिळणार आहे. तसेच हॉटेल, उपाहागृहे प्रत्यक्ष चालू न ठेवता केवळ पार्सल सुविधेची परवानगी दिली आहे. लग्नसमारंभासाठीही निर्बंध लागू करण्यात आले असून, वधू-वरांसह केवळ २५ व्यक्तींना परवानगी राहणार आहे. सर्व प्रकारची शाळा-महाविद्यालये बंदच राहणार आहेत. सार्वजनिक व खासगी वाहतूक करताना चारचाकी वाहनामध्ये चालकाव्यतिरिक्त इतर तीन प्रवाशी, ॲटोमध्ये चालकाव्यतिरिक्त दोन, तर दुचाकीवर हेल्मेट व मास्कसह दोन प्रवाशांना परवानगी राहणार आहे. दुसरीकडे मॉर्निंग वॉक व व्यायामासाठी सकाळी ८ वाजेपर्यंत सूट राहणार आहे.
शनिवारी सायंकाळी ५ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत जमावबंदी आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हा संपूर्ण आदेश १ मार्च २०२१ पर्यंत लागू राहणार आहे. सोबतच वर्तमान स्थिती पाहता मिशन बिगीन अगेन अंतर्गत देण्यात आलेली सूटही रद्द करण्यात आली असल्याचे यासंदर्भातील आदेशात नमूद आहे.धार्मिक स्थळी दहा व्यक्तींना परवानगी
जिल्ह्यातील सर्व धार्मिकस्थळी एकावेळी दहा व्यक्तींनाच परवानगी राहणार आहे. या मर्यादेचे पालन करून धार्मिकस्थळे नागरिकांसाठी सुरू राहू शकतात. यासोबतच शहरी तथा ग्रामीण भागातील जमावबंदीच्या या कालावधीत सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृितक, धार्मिक कार्यक्रम व इतर स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमांना बंदी राहणार आहे.
बस वाहतूकही ५० टक्के क्षमतेने
आंतरजिल्हा बसवाहतूकही एकूण प्रवाशी क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशी घेऊन सुरू ठेवता येईल. तसेच शारीरिक अंतर आणि निर्जंतुकीकरण करून प्रवासी वाहतूक करता येणार आहे. त्यानुषंगाने राज्य परिवहन महामंडळाने नियोजन करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दुसरीकडे मालवाहतूक ही नेहमीप्रमाणे सुरू राहील. या वाहतुकीसाठी कुठल्याही प्रकारचे निर्बंध राहणार नाही, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.
१ मार्चपर्यंत बाजार बंद
जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार हे १ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. शहरी तथा ग्रामीण भागात हा निर्णय लागू राहणार आहे. ठोक भाजीबाजार हा पहाटे ३ ते सकाळी ६ वाजेपर्यंत सुरू ठेवता येईल. तसेच येथे किरकोळ विक्रेत्यांनाच प्रवेश राहणार आहे.