बुलडाणा जिल्ह्यात बाजार समित्यांमधील आवक ४६ टक्क्यांनी घटली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 03:38 PM2019-11-09T15:38:01+5:302019-11-09T15:38:41+5:30
प्रामुख्याने या कालावधीत बाजार समित्यांमध्ये ज्वारी, बाजारी, गहू, उडीद, मुंग, तूर, मका, सोयाबीन या धान्याची आवक होत असते.
- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: अवघ्या ११ दिवसात परतीच्या पावसाने फटका दिल्याने यंदा खरीप हंगामाला मोठा फटका बसला असून आॅक्टोबर २०१८ च्या तुलनेत आॅक्टोबर २०१९ मध्ये बाजार समित्यांमध्ये तब्बल ४६ टक्क्यांनी धान्याची आवक घडल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. दरम्यान, आर्थिकस्तरावर त्याचे मुल्यमापन केले असता ८१ कोटी ९१ लाख आठ हजार २६२ रुपयांपर्यंतची उलाढाल संपलेल्या आॅक्टोबर महिन्यात कमी झाली आहे.
परिणामी परतीच्या पावसाने खरीपाच्या झालेल्या नुकसानाचे दृश्य परिणाम आता समोर येण्यास प्रारंभ झाला आहे नोव्हेंबर अखेर याची तीव्रता अधिक जाणवण्याची भीती व्यक्त होत आहे. २०१४ मध्येही अवर्षण प्रवण स्थितीमुळे बाजार समित्यांमध्ये अवघा ३४ टक्केच माल आला होता. त्याच्याशीच साधर्म्य यंदाची स्थिती दाखवत आहे. मात्र प्रत्यक्ष नुकसानाचे आकलन होण्यासाठी अद्यापही काही कालावधी जावू द्यावा लागेल असे जाणकारांचे मत आहे.
जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीच्या १०३ टक्के पाऊस पडला होता. ही परिस्थिती तशी साधारण होती. मात्र आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यात सरासरी ९ दिवस परतीचा तथा अवकाळी पाऊस पडल्याने तयार झालेला शेतमालही घरात आणण्याची संधी शेतकऱ्यांना मिळाली नाही आणि खरीपाचे जिल्ह्यात ७९ टक्के नुकसान झाल्याचे सात नोव्हेंबर रोजीच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले.
त्या पृष्ठभूमीवर २०१८ आणि २०१९ मधील आॅक्टोबर महिन्यात १३ ही बाजार समित्यांमध्ये झालेल्या धान्याची आवकेची तुलना करता उपरोक्त बाब स्पष्ट झाली आहे. त्यामुळे खरीपामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे समोर येत असून येत्या काळात त्याची व्याप्तीही वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रामुख्याने या कालावधीत बाजार समित्यांमध्ये ज्वारी, बाजारी, गहू, उडीद, मुंग, तूर, मका, सोयाबीन या धान्याची आवक होत असते. मात्री ही आवकच २०१९ मधील आॅक्टोबर महिन्यात घटल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे गतवर्षी अवर्षणाची स्थिती असल्याने मुळातच बाजार समित्यांमध्ये धान्याची आवक घटलेली होती. त्या आवकेच्या तुलनेतही यंदा बाजार समित्यामध्ये ४६ टक्क्यांनी आवक घटल्याचे निदर्शनास येत आहे. यावरून २०१९ मध्ये परतीच्या व अवकाळी पावसामुळे किती नुकसान केले आहे, याचा अंदाज यावा. विशेष म्हणजे आॅक्टोबर २०१९ मध्ये साधारणत: पडणाºया ४४.८४ मिमी पावसाच्या तुलनेत परतीचा व अवकाली पाऊस मिळून तब्बल १००.२२ मिमी पाऊस पडला. जो की आॅक्टोबर महिन्याच्या सरासरीशी तुलना करता तब्बल २२३.५१ टक्के आहे. आणि हाच पाऊस खरीपाचे होत्याचे नव्हते करण्यास खºया अर्थाने कारणीभूत ठरला असावा अशी चर्चा आता प्रशासकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, आता नोव्हेंबरमध्ये बाजार समित्यांमध्ये प्रत्यक्षात धान्याची किती आवक होते व त्याची प्रतवारी नेमकी काय राहते यावर खरीपाच्या झालेल्या नुकसानाचा काही प्रमाणात अंदाज निघू शकतो.
२०१४ मध्ये ६६ टक्क्यांनी घटली होती आवक
जिल्यात २०१४ मध्ये अवर्षणसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी संपूर्ण वर्षाच्या शेतमालाच्या आवकेची तुलना केली असता तब्बल ६६ टक्क्यांनी शेतमालाची बाजार समित्यांमध्ये आवक घटली होती. त्यावेळी २०१३ मध्ये ५५ लाख ९७ हजार ७२० क्विंटल आवक झाली होती तर २०१४ मध्ये १८ लाख ७७ हजार ७२० क्विंटल ऐवढी आवक झाली होती. जवळपास ६६.३६ टक्क्यांनी ही आवक घटली होती. दरम्यान, जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील आगमा काळात नेमकी किती आवक होते हे स्पष्ट झाल्यानंतर खरीपामध्ये शेतकºयाचे शेतमालाचे नेमके किती नुकसान झाले आहे, याचे आकलन करणेही सोपे जाईल, असा कयास व्यक्त केला जात आहे.