बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगला परिसरात आग; निवासस्थान सुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 07:27 PM2018-04-28T19:27:52+5:302018-04-28T19:27:52+5:30
बुलडाणा : सरकारी तलाव भागातील जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या मागील भागास २८ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान अचानक आग लागली.
बुलडाणा : सरकारी तलाव भागातील जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या मागील भागास २८ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान अचानक आग लागली. या आगीत वाळलेले गवत जळून खाक झाले तर परिसरातील झाडे होरपळली. अग्निशमन विभागाने वेळीच आग आटोक्यात आणल्याने निवासस्थानाला कुठलीच झळ पोहचली नाही. आगीचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही. बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानाचा जवळपास २ एकरावर विस्तार आहे. बंगल्याचा परिसर हिरव्यागार दाट वनराईने व्यापला आहे. सध्या कडक उन्हाळा असल्यामुळे गवत व पालापाचोळा वाळलेला आहे. शनिवारी दुपारी अचानक बंगल्याच्या मागील भागात आग लागली. त्यामुळे वाळलेले गवत व पालापाचोळा जळाला. बंगल्यावर उपस्थित कर्मचाऱ्यांनी तत्काळ नगर पालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती दिली. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वेळेत पोहचून ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे निवासस्थानाला आगीची झळ बसली नाही. जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची नुकतीच बदली झाली असून त्यांच्या जागेवर नागपूर येथील डॉ. निरूपमा डांगे रुजू झाल्या आहेत. मात्र अद्याप त्या शासकीय बंगल्यात राहण्यास गेल्या नाहीत. सध्या बंगल्यामध्ये डॉ. पुलकुंडवार यांचे सामान ठेवलेले आहे.
आठवड्यातील आगीची दुसरी घटना
शहरात एकाच आठवड्यात आगीची ही दुसरी घटना आहे. याआधी २५ एप्रिल रोजी वनविभागाच्या शासकीय लाकूड आगार परिसराला आग लागली होती. अग्निशमन विभागाने वेळीच आग आटोक्यात आणल्यामुळे मोठे नुकसान टळले होते. दरम्यान शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थान परिसरात आग लागली.