बुलडाणा जिल्ह्यात हेमाडपंती स्थापत्यशैलीची उपेक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 01:36 PM2019-03-04T13:36:14+5:302019-03-04T13:36:57+5:30

बुलडाणा: जिल्ह्यातील हेमाडपंती मंदिरांचे वैभव सध्या धोक्यात सापडले आहे. अनेक ठिकाणच्या मंदिरांची पडझड झाली असून, काही ठिकाणी जुन्या मूर्तींचे अवशेषही गायब झाल्याचे दिसून येते.

 Buldana district ignores Hemadpanti architecture! | बुलडाणा जिल्ह्यात हेमाडपंती स्थापत्यशैलीची उपेक्षा!

बुलडाणा जिल्ह्यात हेमाडपंती स्थापत्यशैलीची उपेक्षा!

googlenewsNext

- ब्रह्मानंद जाधव
बुलडाणा: जिल्ह्यातील हेमाडपंती मंदिरांचे वैभव सध्या धोक्यात सापडले आहे. अनेक ठिकाणच्या मंदिरांची पडझड झाली असून, काही ठिकाणी जुन्या मूर्तींचे अवशेषही गायब झाल्याचे दिसून येते. लोणार सरोवर काठावरील आठ हेमाडपंती मंदिरांच्या कामांना मान्यता मिळाली असून, एका मंदिराला ३५ ते ४० लाख रुपयांपर्यंत निधी मंजूर झाला आहे; परंतु या मंदिरांची कामे अडली कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सोमवारी असलेल्या महाशिवरात्री उत्सवाच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील हेमाडपंती शिव मंदिरांची माहिती घेतली असता हेमाडपंती स्थापत्यशैलीची उपेक्षाच समोर आली. जिल्ह्याला मध्ययुगीन व हेमाडपंती मंदिररूपी धार्मिक असा मौल्यवान वारसा लाभलेला आहे. जागतिक दर्जाच्या लोणार सरोवराच्या बाह्य कडेवर २६ हेमाडपंती शिव मंदिरे मोठ्या दिमाखात उभी आहेत. सरोवर परिसरातही अनेक प्राचीन मंदिरे आहेत. सरोवर काठावरील शंकर गणेश मंदिर, रामगया मंदिर, अंबरखाना मंदिर, शुक्राचार्य वेध शाळा, यज्ञवल्केश्वर, सीता न्हाणी, कुमारेश्वर, पापहरेश्वर, हटकेश्वर, बह्मकुंड, यमतीर्थ, सोमतीर्थ, वायूतीर्थ यासह अनेक पौराणिक शिव मंदिर शिल्पकलेची साक्ष देत आहेत; परंतु सध्या या मंदिरांची अत्यंत दुरवस्था झाल्याचे दिसून येते. पुरातन विभागाकडून या मंदिराची केव्हाच स्वच्छता किंवा डागडुजी केल्या जात नसल्याने हेमाडपंती मंदिररूपी ठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. सरोवर काठावरील दुर्लक्षित शिव मंदिरामध्ये दिवसा काळा कुट्ट अंधार राहत असून, तेथे साप, वटवाघळासह विविध दुर्मीळ कीटकही आढळून येतात. त्यामुळे अनेक भाविक सरोवर काठावरील शिव मंदिरात जाण्याचे टाळत आहेत. यातील आठ मंदिराच्या कामांना मान्यता मिळालेली आहे; परंतु अद्यापही अंमलबजावणीला सुरुवात झाली नाही. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतंर्गत लोणारसाठी १० कोटी ९८ लाखांचा निधी मागील वर्षी मिळाला. यातून ७ कोटी १२ लाखांचा निधी खर्च करण्यात आला असून, ६ कोटी ६० लाखांचा निधी प्रत्यक्ष सांडपाणी व्यवस्थापनासह, निरीक्षण मनोरे उभारणीसाठी खर्च झाला आहे. लोणारबरोबरच इतर ठिकाणच्या मंदिरांची अवस्था दयनीय आहे.


नीळकंठेश्वर मंदिराच्या कामावर कोट्यवधींचा खर्च
सिंदखेड राजा येथील नीळकंठेश्वर मंदिराच्या दगडी फरशीच्या कामाला सध्या वेग आला आहे. या मंदिराच्या कामावर १ कोटी २७ लाख ८८ हजार ८३८ रुपये खर्च अपेक्षित आहे. ३११ कोटींच्या सिंदखेड राजा विकास आराखड्यांतर्गत ही कामे सुरू आहेत. मागील वर्षी पुरातत्व खात्यातंर्गत २५ कोटी रुपायांच्या कामांना मान्यता देण्यात आली असून, त्यापैकी २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालेला आहे. यापैकी १२ कोटी ९६ लाख ४९ हजार १७५ रुपयांची कामे सध्या सुरू आहेत. त्यातंर्गत सध्या

हेमाडपंती स्थापत्यशैली
भारतीय स्थापत्यशैलींपैकी एक प्रमुख शैली म्हणून हेमाडपंती शैलीचा उल्लेख केला जातो. देवगिरीच्या यादवांच्या राज्याचे सन १२५९ ते १२७४ या काळात मुख्य प्रधान राहिलेल्या हेमाद्री पंडित किंवा हेमाडपंत यांनी या प्रकारच्या ईमारत बांधणीचा महाराष्ट्र आणि दख्खन पठारावर अनेक ठिकाणी उपयोग केल्याने ही बांधणी पद्धत त्यांच्या नावावरून हेमाडपंती म्हणून ओळखली जाऊ लागली. मंदिरांचे हेमाडपंती पद्धतीने झालेले बांधकाम टिकून राहिले आणि त्यामुळे ते आजही अभ्यासकांना उपलब्ध आहे. सामान्यत: इमारत बांधणीत घडवलेल्या दगडांमध्ये चुना किंवा त्या प्रकारचा दर्जा न भरता दगडच वेगवेगळ्या कोनातून कापून, त्यांनाच खुंट्या आणि खाचा पाडून ते एकमेकांत घट्ट बसू शकतील अशी रचना केली जाते. मंदिरांसारख्या वास्तूत पायापासून शिखरापर्यंत ही दगड एकमेकांत गुंफून केलेली रचना एकसंध उभी राहाते आणि टिकाऊही बनते.

 

Web Title:  Buldana district ignores Hemadpanti architecture!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.