बुलडाणा जिल्ह्यात डेंग्यूचा धोका वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 02:17 PM2019-07-26T14:17:41+5:302019-07-26T14:18:00+5:30
शहरी तसेच ग्रामिण भागात डेंग्यूचा धोका वाढला असल्याने आरोग्य विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
योगेश फरपट / विजय मिश्रा
खामगाव/शेगाव : शहरी तसेच ग्रामिण भागात डेंग्यूचा धोका वाढला असल्याने आरोग्य विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. किटकजन्य कार्यक्रमाअंतर्गत खामगाव, शेगाव व मलकापूर पालिकेतर्फे डेंग्यू सर्व्हेक्षण मोहिमेस सुरवात झाली आहे. यासाठी पालिकेच्या मदतीने आरोग्य विभागाने जनजागृती सुरु केली आहे.
डेंग्यूच्या डासांची पैदास साठवून ठेवलेल्या पाण्यात होत असल्याने ती स्थाने शोधून काढणे हे काम जिकीरीचे झाले आहे. यासाठी पालिका प्रशासनाबरोबरच नागरिकांनीही सतर्क राहून डेंग्यूचा फैलाव रोखणे आवश्यक आहे. तापाचे रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. खामगावसह सर्वच शहरात पाण्याची टंचाई अद्याप कायम आहे. यामुळे नागरिकांना पावसाळ््यातही पाणी साठवण करावी लागत आहे. यामुळे डासांची उत्पत्ती होत आहे.
रुग्णांची संख्या वाढत असली तरी शेगाव व खामगाव वगळता इतर शहरामध्ये किंवा गावांमध्ये पालिका प्रशासनाच्या वतीने प्रयत्न होतांना दिसत नाही. शेगाव शहरातील काही वस्त्यांसह ग्रामिण भागात प्रामुख्याने डें्ग्यूची लागण झाल्याचे दिसून येते. वेळीच उपाययोजना न केल्यास रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
डेंग्यूच्या फैलावाला कारणीभूत असलेल्या डासांचा व त्यांच्या अळ्यांच्या नष्ट करण्यावर आरोग्य यंत्रणेचा भर आहे. डेंग्यूचा प्रादुर्भाव होतो, त्या एडिस जातीच्या डासांच्या अळ्या नष्ट करण्याचे आदेश आरोग्य यंत्रणेला देण्यात आले आहे. त्यासाठी अळ्या सापडलेल्या पाण्यात सेमिफॉस या तेल पाण्यात टाकून डास नष्ट करण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शेगाव शहरात डेंगू रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने आरोग्य विभागाकडून शहरात २२ ते २७ जुलैपर्यंत जिल्हा आरोग्य अधिकारी, हिवताप अधिकारी व जिल्हाचिकित्सक यांचे सूचनेनुसार डेंगू व किटकजन्य रोग नियंत्रण करीता जनजागृती व डास, अळी कंटेनर सर्वेक्षण शोध मोहीम सोबत माहितीपत्रक सह घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण केले जात आहे. या पथकामध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा सेविकांचा समावेश आहे.
जनतेला डेंगू आजार विषयक मार्गदर्शन करण्यासोबतच डेंगू सदृश्य अंडी आढळल्यास त्यामध्ये औषधी द्वारे निजंर्तुकीकरण ही करून दिल्या जात आहे. नागरिकांनी सर्वतोपरी काळजी घेवून ताप आल्यास तत्काळ डॉक्टरांकडे जावून उपचार घ्यावा असे आवाहन शेगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी मानकर यांनी केले आहे.
ही आहेत कारणे
डेंग्यू ताप (हाडमोडी ताप) हा आजार विशिष्ट विषाणूंमुळे होतो. डेंग्युचा प्रसार ‘एडीस एजिप्टाय’ नावाच्या डासापासून होतो. या डासाची उत्पत्ती साठविलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. यामध्ये प्रामुख्याने इमारतीच्या, सिमेंटच्या टाक्यांमधील, रांजणामधील पाणी तसेच प्लास्टिकच्या बादल्या, रिकाम्या बादल्या, नारळाच्या करवंट्या, घरातील शोभेच्या कुंड्या, फुलदाण्या, निरुपयोगी टायर्स, कुलर आदींमध्ये डासांची उत्पत्ती होते.
कोरडा दिवस पाळावा , कोरडा दिवस म्हणजे आठवड्यातून एकदा पाण्याचे साठे रिकामे करावेत. रांजण, माठ, हौद , टाकी व इतर हे पाण्याचे साठे घासून पुसून कोरडे करून तीन चार तासा नंतर पाणी भरावे त्यामुळे डासाची उत्पत्ती होणार नाही.
- डॉ. बाळकृष्ण कांबळे,
जिल्हा आरोग्य अधिकारी, बुलडाणा.