बुलडाणा जिल्ह्याची काेराेनामुक्तीकडे वाटचाल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 10:53 AM2021-07-20T10:53:55+5:302021-07-20T10:54:04+5:30
Buldana district on its way to become CoronaFree : जिल्ह्यात साेमवारी केवळ १६ सक्रिय रुग्ण असून, अनेक तालुक्यांमध्ये गत काही दिवसांपासून नवीन रुग्ण सापडले नसल्याचे चित्र आहे.
- संदीप वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : आराेग्य विभाग आणि प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातून काेराेना परतीच्या मार्गावर असल्याचे दिलासादायक चित्र आहे. जिल्ह्यात साेमवारी केवळ १६ सक्रिय रुग्ण असून, अनेक तालुक्यांमध्ये गत काही दिवसांपासून नवीन रुग्ण सापडले नसल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात दुसऱ्या लाटेची भीषणता आराेग्य विभागासह सर्वसामान्य नागरिकांनी अनुभवली आहे. गत काही दिवसांपासून आराेग्य विभाग आणि प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांमुळे, तसेच नागरिकांनी नियमांचे पालन केल्याने काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९९.२१ टक्क्यांवर पाेहोचला आहे, तसेच साेमवारचा पाॅझिटिव्हिटी रेट अवघा ०.५७ टक्के हाेता. नागरिकांनी यापुढेही नियमांचे पालन केल्यास जिल्हा लवकरच काेराेनामुक्त हाेणार आहे. तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यातच रुग्णसंख्या कमी झाल्याने ग्रामीण भागात नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात येत आहे, तसेच फिजिकल डिस्टन्सिंग, वारंवार हात धुणे, मास्कचा वापर करणे आदी बाबींचा सर्वसामान्यांना विसर पडत असल्याचे चित्र आहे.
आठ तालुक्यांमध्ये प्रत्येकी केवळ एक रुग्ण सक्रिय
जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी आठ तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सक्रिय आहे, तसेच मलकापूर तालुक्यात एकही रुग्ण नसल्याचे चित्र आहे. एक रुग्ण असलेल्या तालुक्यांमध्ये चिखली, देऊळगाव राजा, लाेणार, खामगाव, शेगाव, संग्रामपूर, नांदुरा, माेताळा आदी तालुक्यांचा समावेश आहे, तसेच बुलडाणा, सिंदखेडराजा आणि जळगाव जामाेद तालुक्यात प्रत्येकी दाेन रुग्ण सक्रिय आहेत.
जिल्ह्यात गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या कमी हाेत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. मात्र, जिल्हा काेराेनामुक्त हाेत असल्याचा अंदाज वर्तविणे आता थाेडे घाईचे हाेईल. आणखी आठ दिवस अशीच स्थिती राहिल्यास काेराेनामुक्तीकडे वाटचाल असे म्हणता येईल. काेराेनाची संभाव्य तिसरी लाट पाहता नागरिकांनी नियमांचे पालन करण्याची गरज आहे.
-डाॅ. बाळकृष्ण कांबळे, जिल्हा आराेग्य अधिकारी, बुलडाणा