बुलडाणा जिल्हय़ात धान्याच्या गळतीवर शिक्कामोर्तब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 01:20 AM2018-04-13T01:20:04+5:302018-04-13T01:20:04+5:30

खामगाव: रेशनच्या धान्याला वाटेतच मोठी गळती लागत असल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या आठवड्यात उघडकीस आला. या प्रकाराच्या वृत्ताची ‘शाई वाळते ना वाळते’ तोच अपेक्षित नियतनापेक्षा मालाची कमी आवक होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.  महसूल प्रशासनाने ही बाब एक-दोन नव्हे तर तब्बल २८ वेळा निदर्शनास आणून दिली; मात्र याबाबत कोणतीही उपाययोजना न करण्यात आल्याने, जिल्ह्यात धान्याच्या गळतीवर शिक्कामोर्तब होत असल्याचे दिसून येते.

Buldana district leakage on the grain leak! | बुलडाणा जिल्हय़ात धान्याच्या गळतीवर शिक्कामोर्तब!

बुलडाणा जिल्हय़ात धान्याच्या गळतीवर शिक्कामोर्तब!

Next
ठळक मुद्देरेशन माफियांचे मोठे जाळे! विविध २८ पत्रव्यवहारातून होतोय उलगडा 

अनिल गवई। 
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: रेशनच्या धान्याला वाटेतच मोठी गळती लागत असल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या आठवड्यात उघडकीस आला. या प्रकाराच्या वृत्ताची ‘शाई वाळते ना वाळते’ तोच अपेक्षित नियतनापेक्षा मालाची कमी आवक होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.  महसूल प्रशासनाने ही बाब एक-दोन नव्हे तर तब्बल २८ वेळा निदर्शनास आणून दिली; मात्र याबाबत कोणतीही उपाययोजना न करण्यात आल्याने, जिल्ह्यात धान्याच्या गळतीवर शिक्कामोर्तब होत असल्याचे दिसून येते.
भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून शासकीय गोदामात धान्य पोहोचविण्यात येते.  यासाठी जिल्हा पुरवठा विभागामार्फत एका खासगी कंत्राटदारास धान्य पुरविण्यासाठी कंत्राट देण्यात आला आहे. दरम्यान, धान्याची वाहतूक करणार्‍या ट्रकमधून धान्य कमी मिळत असल्याची तक्रार खामगाव येथील गोदाम व्यवस्थापकांनी तहसील प्रशासनाकडे केली आहे. या तक्रारीचा उलगडा होत नाही, तोच अपेक्षित नियतनापेक्षा मालाची कमी आवक होत असल्याच्या एक-दोन नव्हे तर  तब्बल २८ तक्रारी जिल्हा पुरवठा विभागाकडे करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  उल्लेखनीय म्हणजे ९ नोव्हेंबर २0१७ ते २६ मार्च २0१८ या कालावधीत उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने २८ वेळा पत्रव्यवहार करण्यात आला. गोदाम पालक आणि गोदाम व्यवस्थापकांचा संदर्भदेत महसूल प्रशासनाच्यावतीने पुरवठा विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला; मात्र याबाबत कोणताही सकारात्मक पाठपुरावा करण्यात आला नसल्याचा सूत्रांचा दावा आहे. त्यामुळे जिल्ह्यात रेशनच्या धान्याचा काळा बाजार करणार्‍यांचे ‘नेटवर्क’ चांगलेच विस्तारल्याची चर्चा होत आहे. दरम्यान, यासंदर्भात अधिक माहितीसाठी  महसूल विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता, उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने जिल्हा पुरवठा विभागाशी २६ मार्च २0१८ रोजी पत्रव्यवहार करण्यात आल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. 

जिल्हा प्रशासनाचा विरोधाभासी न्याय!
शेलूद येथे २२ जून २0१७ रोजी एमएच-१९-झेड-२0९७ क्रमांकाचा ट्रक  ३५0 कट्टे तांदुळासह पकडण्यात आला. यामध्ये ट्रक चालक  आणि ट्रक मालकाविरोधात जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये चिखलीत गुन्हा दाखल झाला. दरम्यान, भारतीय अन्न महामंडळाच्या टेंभुर्णा येथील बेस डेपोमधून हा ट्रक अमडापूर येथील शासकीय गोदामात जाणे आवश्यक होते; मात्र स्टेटमेंट-२ आणि ट्रान्सफर ऑर्डरवर ‘अमडापूर’ खोडून त्यावेजी ‘चिखली’ अशी नोंद आढळून आल्याने खामगाव तहसीलचे अव्वल कारकून तथा प्रभारी वाहतूक प्रतिनिधी जी. व्ही. चोपडे यांना जिल्हा प्रशासनाने निलंबित केले होते. यावेळी चोपडे यांची प्रथम आस्थापना खामगाव तहसील असल्याचे टाळत चोपडेंवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर चिखली पोलिसांनीही चोपडे यांना सहआरोपी करीत गुन्हा नोंदविला होता. दरम्यान, खामगाव येथील गहू अफरातफर प्रकरणात जिल्हा विभागाच्या वाहतूक प्रतिनिधींवर गुन्हा दाखल असतानाही अद्याप त्यांच्यावर कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. 

व्यवस्थापकांच्या तक्रारीचीही भर!
भारतीय अन्न महामंडळाच्या टेंभुर्णा येथील गोदामातून खामगाव येथील शासकीय गोदामात धान्य वेळेवर पोहोचत नाही. धान्य वाहतूक करणार्‍या ट्रकमधून कमी धान्य येत असल्याची लेखी तक्रार खामगाव शासकीय गोदाम व्यवस्थापकांनी तहसीलदारांकडे केली. नियतनापेक्षा, वजनापेक्षा कमी धान्य मिळत असून, खामगाव गोदाम व्यवस्थापकांची ही तक्रार २९ वी तक्रार असल्याची माहिती आहे.
 

Web Title: Buldana district leakage on the grain leak!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.