बुलडाणा जिल्हा : ग्रामीण भागात शौचालय वापराकडे दुर्लक्ष!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 12:12 AM2017-12-23T00:12:15+5:302017-12-23T00:12:45+5:30
लोणार: स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत ग्रामस्वच्छता लोणार पंचायत समितीमार्फत शौचालय बांधकामास जोरात सुरुवात करण्यात आली. पारितोषिक मिळविण्याच्या उद्देशाने का होईना तालुक्यातील गावे स्वच्छ व सुंदर बनतील, असे वाटले होते; मात्र फोटोसेशनपुरते काम झाल्यावर अधिकार्यांना स्वच्छ भारत अभियानाचा पुरता विसर पडला आहे.
किशोर मापारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार: स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत ग्रामस्वच्छता लोणार पंचायत समितीमार्फत शौचालय बांधकामास जोरात सुरुवात करण्यात आली. पारितोषिक मिळविण्याच्या उद्देशाने का होईना तालुक्यातील गावे स्वच्छ व सुंदर बनतील, असे वाटले होते; मात्र फोटोसेशनपुरते काम झाल्यावर अधिकार्यांना स्वच्छ भारत अभियानाचा पुरता विसर पडला आहे. यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात शौचालय वापराकडे दुर्लक्ष झाले असून, तालुका शौचालयमुक्त होईल की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे.
लोणार तालुक्यातील गुंधा, हिरडव, उदनापूर, वाल्हूर, कोयाळी दहोतोंडे, हत्ता, तांबोळा, वेणी, स्वरस्वती, मातमळ, किन्ही, शारा, हिवराखंड, हत्ता, अंजनी खुर्द, शिवनी पिसा, मोहोतखेड आदी गावात सर्वत्र घाणच घाण दिसून येत आहे. या गावातील काही नागरिकांनी शौचालयासाठी शोचखड्डे तयार करून शौचालयाच्या भिंती उभारल्या; मात्र त्याचा उपयोग केवळ आंघोळ करण्यासाठी केला जात आहे. काहींनी तर केवळ भिंतीच उभारून शासनाचा निधी लाटला असल्याचे दिसून आले. शासनाच्या निधीचा दुरुपयोग करणार्या ग्रामस्थांकडून कुठलीही तमा न बाळगता सकाळीच गावाजवळील रस्त्यावर घाण केली जात आहे.
त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रकारामुळे लोणार तालुक्यात स्वच्छ भारत अभियानाचा पुरता फज्जा उडाला आहे. लोणार पंचायत समिती अधिकार्यांनी कधी हातात झाडू घेऊन तर कधी गुडमॉर्निंग पथक राबवून केवळ फोटो काढण्यापुरतेच स्वच्छता अभियान राबविल्याचे दिसून येत आहे.
शौचालय बांधले; मात्र वापरावर प्रश्नचिन्ह
लोणार पंचायत समिती अंतर्गत ५९ ग्रामपंचायतींचा समावेश असून, ८१ गावांचा समावेश आहे. स्वच्छ भारत अभियान १00 टक्के राबविण्याचे सर्व ग्रामपंचायतीला उद्दिष्ट देण्यात आले. स्वच्छता अभियान राबविण्याच्या वेळेस वेगवेगळ्या अँगलमध्ये फोटो काढून कांगावा करण्यात आला. त्यानंतर या अभियानाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे या अभियानाचा फज्जा उडाला आहे. ग्रामपंचायतीच्या देखरेखीखाली वैयक्तिक शौचालय बांधण्यात आले; मात्र बांधण्यात आलेल्या शौचालयाचा वापर होत आहे का, याची प्रत्यक्ष तपासणी झाल्याचे दिसून येत नाही. ग्रामीण भागात अजूनही उघड्यावर शौचास जाण्याचा प्रकार दिसून येत आहे. अनेकांनी शौचालयांना स्नानघर बनविले आहे.
शौचालयांची नोंद कागदोपत्रीच!
२0१६-१७ साठी ११ हजार ३४0 शौचालय पूर्ण करण्याचे उद्दिष्ट लोणार पंचायत समितीला प्राप्त झालेले आहे. त्यापैकी ४ हजार ६७३ शौचालयांचे काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले आहे. १२ हजार रुपये प्रत्येक शौचालय धरल्यास आतापर्यंत यावर्षी ५ कोटी ६0 लाख ७६ हजार इतका खर्च होऊनही तालुक्यातील गावांभोवती घाण दिसून येत आहे. यामुळे शासनाचा कोटी रुपयांचा निधी नेमका कुठे खर्च होतोय हा प्रश्न निर्माण झालेला असून लोणार पंचायत समितीमार्फत शौचालय कागदोपत्री राबवित असल्याचे दिसून येत आहे.
-