बुलडाणा जिल्ह्यात एसटीची प्रवासी संख्या २५ टक्क्यांनी घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 11:52 AM2021-02-23T11:52:09+5:302021-02-23T11:53:45+5:30
Khamgaon News कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने एसटीची प्रवासी संख्या जवळपास २५ टक्क्यांनी घटली असल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : लॉकडाऊनमध्ये पूर्णपणे बंद असलेली एसटी प्रवासी वाहतूक लॉकडाऊननंतर खुली करण्यात आली. सुरुवातीला एसटीने प्रवास करण्यास प्रवाशांचा जेमतेम प्रतिसाद मिळत होता. आता गेल्या आठवडाभरापासून कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने एसटीची प्रवासी संख्या जवळपास २५ टक्क्यांनी घटली असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, खामगाव, मेहकर, मलकापूर, जळगाव जामोद, शेगाव असे सात आगार आहेत. कोरोनाआधी एसटी महामंडळाची सातही आगारांची रोजची प्रवासी संख्या एक लाखांपेक्षा जास्त होती. सद्य:स्थतीत ही संख्या ७० ते ७५ हजारांवर आली आहे. यावरून कोरोना आजाराच्या वाढत्या रुग्णसंख्येचा एसटी प्रवासी वाहतुकीवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे एसटीची प्रवासी संख्या जवळपास २५ टक्क्यांनी कमी झाली आहे. जिल्ह्यातील सातही आगारातून दररोज १५ हजारांपेक्षा जास्त प्रवासी कोरोनापूर्वी प्रवास करीत होते. यामुळे एसटीच्या उत्पन्नात भरमसाट वाढ झाली होती. मात्र, जिल्ह्यात २० फेब्रुवारी रोजी कोरोनाच्या रुग्णसंख्येने तीनशेचा आकडा पार केला. यामुळे एसटी महामंडळाने प्रत्येक बसेसच्या चालक-वाहकांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. चालक-वाहकांनी बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांना मास्क घातल्याशिवाय चढू देऊ नये, अशा सूचनाही दिल्याचे विभागीय वाहतूक नियंत्रक ए. यू. कच्छवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
अनेक ठिकाणी निम्मे प्रवासी
जिल्ह्यात १५ ते २० दिवसांअगोदर कोरोनाचे प्रमाण कमी होते. परंतु, आठ दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे प्रवासी संख्येत घट होताना दिसून येत आहे. अनेक ठिकाणी ग्रामीण भागात प्रवासी निम्म्यांवरच आले आहेत. कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन एसटी महामंडळाने सर्वच कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत.
प्रवाशांच्या सुरक्षेचे काय?
लॉकडाऊन सुरू असताना जिल्ह्यातील सर्वच आगारातील सर्वच बसेस बंद होत्या. त्यानंतर, लॉकडाऊन खुला केल्यानंतर आगाराने बसेस सुरू केल्या आहेत. तेव्हापासून आजतागायत बसेस सुरू आहेत. सध्या आठवडाभरापासून कोरोना रुग्णांत झपाट्याने वाढ होत आहे. तेव्हा एसटी महामंडळाने रोजच्या रोज बसेस धुऊन त्यात सॅनिटायझरची फवारणी करणे बंधनकारक आहे. परंतु, तसे होताना दिसून येत नाही.