बुलडाणा जिल्ह्यात ३८ दिवसानंतर ५४ टक्केच लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 11:40 AM2021-02-25T11:40:09+5:302021-02-25T11:40:22+5:30
coronavaccine news कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाने आता वेग घेतला असला तरी लसीकरण मोहिमेचा सरासरी वेग कमीच आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोना लसीकरणास प्रारंभ होऊन ३८ दिवस पूर्ण झाल्यानंतरही आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन कर्मचारी मिळून केवळ ५४ टक्केच लसीकरण झाले आहे. एकीकडे कोरोनाचे संक्रमण जिल्ह्यात वाढत असताना त्या तुलनेत हा वेग कमी असल्याचे चित्र आहे. त्यातच फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाने आता वेग घेतला असला तरी लसीकरण मोहिमेचा सरासरी वेग कमीच आहे.
प्रामुख्याने आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा वेग कमी आहे. बुलडाणा जिल्ह्यात २६,५५० आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्याचे उद्दिष्ट असून, १८ हजार १०० आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत ११ हजार ९५ कर्मचाऱ्यांनीच लस घेतली आहे, तर फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचे लसीकरण उशिरा सुरू होऊनही ते ३७ टक्क्यांवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे बऱ्याच फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांची पोर्टलवर नोंद होण्यास विलंब झाला होता. ८,४५० फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांपैकी ३१४४ कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत लस घेतली आहे. त्यामुळे फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा वेग सध्या वाढलेला दिसत आहे. बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर २४ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष पाहणी केली असता प्रामुख्याने फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचीच संख्या त्या अधिक असल्याचे निदर्शनास आले.
बुलडाणा जिल्ह्यात एकूण १३ केंद्रांवर कोराेना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत आहे. प्रतिदिन एका केंद्रावर किमान महत्तम ५० व्यक्तींना कोरोना लस देण्यात येते. मंगळवार व रविवारी हे लसीकरण बंद असते. त्यातच नोंदणी केलेल्या काही कर्मचाऱ्यांची नावे अद्याप ॲपवर दिसत नाहीत. त्यामुळे अडचणी असल्याचे एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. पहिल्या डोसानंतर १०९२ जणांनी कोरोनाचा दुसरा डोस घेतला आहे. हे सर्व आरोग्य विभागातील कर्मचारी आहेत. फ्रंटलाईन वर्कर्सचे अद्याप दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण झालेले नाही.
एकही डोस गेला नाही वाया
जिल्ह्यात सध्याच्या घडीला ५९,१०० व्हॅक्सिनचे डोस उपलब्ध असून, बुलडाणा येथील डिस्टिक व्हॅक्सिन स्टोअरमध्ये सुसज्ज शीतकरण साखळीमध्ये ते ठेवण्यात आलेले आहे. कोविशिल्डचे ५१,१०० तर को-वॅक्सिनचे ७,१०० डोस उपलब्ध झालेले आहे. जिल्ह्यातील अन्य केंद्रांवर बुलडाणा येथून जवळपास आठवडाभर पुरतील एवढे व्हॅक्सिन देण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
प्रतीक्षालयात गर्दी
कोरोना लसीकरणासाठी आलेल्यांची बुलडाणा लसीकरण केंद्रावर गर्दी झाल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी सुरक्षित अंतरही राखल्या गेले नव्हते. त्या तुलनेत निरीक्षण केंद्रामध्ये योग्य पद्धतीने शारीरिक अंतर पाळल्या जात होते तर आरोग्य यंत्रणाही येते सज्ज होती.