बुलडाणा जिल्ह्यात कांदा चाळीच्या उद्देशालाच हरताळ; कृषी विभागाकडून पडताळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 02:22 PM2018-01-15T14:22:28+5:302018-01-15T14:23:40+5:30
खामगाव : शास्त्रोक्त पद्धतीने कांदा साठविण्याच्या मूळ उद्देशाने शासनाकडून कांदा चाळीचे वितरण करण्यात येत आहे; मात्र कांदा चाळीच्या योजनेच्या मूळ उद्देशाला हरताळ फासण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
- अनिल गवई
खामगाव : शास्त्रोक्त पद्धतीने कांदा साठविण्याच्या मूळ उद्देशाने शासनाकडून कांदा चाळीचे वितरण करण्यात येत आहे; मात्र कांदा चाळीच्या योजनेच्या मूळ उद्देशाला हरताळ फासण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. परिणामी, कृषी विभागाकडून सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात वितरित करण्यात आलेल्या कांदा चाळीची पडताळणी करण्यात येत आहे.
कांदा उत्पादक शेतकºयांचे कांदा साठवणुकीतील नुकसान कमी करण्यासाठी तसेच शास्त्रोक्त पद्धतीने कांदा साठवणूक करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कांदा उत्पादक शेतकºयांना अनुदानावर कांदा चाळीचे वितरण करण्यात येत आहे; मात्र या कांदा चाळीच्या अनुदानाचा जिल्ह्यात दुरुपयोग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याबाबत कृषी विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कृषी विभागाकडून सन २०१६-१७ या आर्थिक वर्षामध्ये मंजूर झालेल्या कांदा चाळींची पडताळणी कृषी विभागामार्फत कृषी पर्यवेक्षकाद्वारे करण्यात येत आहे. या पडताळणीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्याने, जिल्ह्यात कांदा चाळ वितरणात घोळ झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, यासंदर्भात खामगाव येथील तालुका कृषी अधिकारी एस. एस. ढाकणे यांच्याशी संपर्क साधला असता, गत आठवड्यात खामगाव तालुक्यातील कांदा चाळींची पडताळणी करण्यात आली. विविध योजनांच्या लाभार्थींची फेरपडताळणी ही नित्याचीच प्रशासकीय प्रक्रिया असल्याचे सांगत कांदा चाळीच्या पडताळणीसंदर्भात अधिक बोलण्याचे टाळले.
पडताळणीसाठी तालुक्यांमध्ये बदल!
कांदा चाळीच्या (क्रॉस चेकिंग) पडताळणीसाठी कृषी पर्यवेक्षकांना स्वत:चा तालुका सोडून ड्युटी दिली जात आहे. खामगाव तालुक्यात गेल्या आठवड्यात पडताळणी करण्यात आली. यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. कांदाचाळीची उभारणी न करताच तसेच कागदोपत्री कांदा चाळीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आल्याची चर्चा आहे. दरम्यान, पडताळणीचा अहवाल वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात आला आहे. यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर तक्रार करण्यात आली आहे.
खामगाव तालुक्यात ३५ कृषी पर्यवेक्षकांकडून पाहणी!
बुलडाणा जिल्ह्यात कांद्याचे सर्वाधिक उत्पादन खामगाव तालुक्यात घेतले जाते. मागील आर्थिक वर्षात खामगाव तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक २५० कांदा चाळींना मान्यता देण्यात आली. कांदाचाळीची संख्या अधिक असल्यामुळे खामगाव तालुक्यात गत आठवड्यात चिखली, बुलडाणा, मेहकर, संग्रामपूर, जळगाव जामोद, लोणार, सिंदखेडराजा येथील तब्बल ३५ कृषी पर्यवेक्षकांनी कांदा चाळीची पडताळणी केली.