बुलडाणा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची शाळा बंद अध्ययन मात्र सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 10:14 AM2020-04-24T10:14:26+5:302020-04-24T10:21:22+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील सर्व शाळांसाठी आॅनलाइन अभ्यासमाला सुरू झाली आहे .
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी १६ मार्च पासून शाळा बंद झाल्या. त्यानंतर राज्यासह देशभरात लॉकडाऊन सुरू झाले. अचानक निर्माण झालेली ही परिस्थिती पाहता शालेय विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या माध्यमातून आॅनलाईन अभ्यासमाला हा उपक्रम संपूर्ण राज्यभर सुरू झाला. त्यानुसार बुलडाणा जिल्ह्यातील सर्व शाळांसाठी आॅनलाइन अभ्यासमाला सुरू झाली आहे . त्यामुळे शाळा बंद असल्यातरी विद्यार्थ्यांचे शिकणे सुरू आहे.
बुलडाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस .षण्मुगराजन यांचे मार्गदर्शनात व बुलडाणा जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विजयकुमार शिंदे आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ई. झेड. खान यांच्या पुढाकाराने प्रत्येक केंद्रातील व्हाट्सअॅप गृपच्या माध्यमातून अभ्यासमालेची माहिती देण्यात येते. डाएट अधिव्याख्याता, विषय सहाय्यक-समुपदेशक, केंद्रप्रमुख ,विषय साधनव्यक्ती यांच्या माध्यमातून प्रत्येक शाळेच्या पालकांचे व्हाट्सअप ग्रुप तसेच शिक्षकांचे विविध व्हाट्सअप ग्रुप यांच्या माध्यमातून ही अभ्यासमाला दररोज पोहोचविण्यात येते. हा आॅनलाईन अध्ययनाचा उपक्रम विद्यार्थ्यांच्या अतिशय आवडीचा झाला असून पालकांनीही या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. विविध शिक्षक, पालक यांच्या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थी आॅनलाइन अध्ययन, गृहपाठ पूर्ण करतात. त्यासाठी पालकांच्या अँड्रॉइड मोबाईलवर ही अभ्यासमाला शिक्षकांच्या माध्यमातून दररोज पाठवण्यात येते. तसेच सर्व पालक व शिक्षकांनी आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत ही अभ्यासमाला कशी पोहोचवता येईल यादृष्टीने दक्ष असावे अशा सूचना शिक्षणाधिकारी ई झेड खान यांनी दिल्या आहेत.
जिल्हाभरातील उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा ही अभ्यासमाला सुरू करण्यात आलेली आहे . महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचे संचालक दिनकर पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राज्यभरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी राबविला जात आहे. राज्यातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा हा उपक्रम मुलांमध्ये अभ्यासाबद्दल आवड निर्माण करण्यासाठी सहाय्यक ठरत आहे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या मार्फत ह्या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून या उपक्रमाला जिल्हाभर पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातात. विविध लिंक द्वारे मराठी, गणित, इंग्रजी, विज्ञान सामाजिक शास्त्रे अभ्यासमाला सर्व विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेली आहे. राज्यभरातील तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या दीक्षा अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आॅनलाईन अभ्यासक्रमाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘झूम’ मिटींग!
या उपक्रमाची जिल्हाभरात प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून दिनांक २१ एप्रिल २०२० रोजी प्राचार्य विजयकुमार शिंदे यांच्या पुढाकाराने डायट अधिव्याख्याता, विषय सहाय्यक व समुपदेशक यांची झूम मिटिंग संपन्न झाली. राज्यस्तरावरून देण्यात आलेल्या सूचनांबाबत प्राचार्यांनी सर्वांना अवगत केले . जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी एस .षण्मुगराजन यांनी डाएट प्राचार्य, शिक्षणाधिकारी यांचेकडून दैनंदिन आॅनलाईन अभ्यासमाला या उपक्रमाचा आढावा घेतला. तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचविण्यासाठी सर्वांनी सक्रिय राहावे असे सुचविले .
दर रविवारी घेतली जाते आॅनलाईन परीक्षा!
शाळा बंद झाल्यापासून या अभ्यासमालेत इयत्ता पहिली ते दहावीच्या दररोज एक विषय घेऊन लिंक दिल्या जातात . विद्यार्थी आपल्या इयत्तेनुसार सदर लिंक पाहून त्यातील मुद्दे प्रश्न वहीवर दररोज सोडवतात. घटकाला अनुसरून व्हिडिओंचा समावेश या अभ्यासमालेत करण्यात आला आहे. दर रविवारी झालेल्या व पाहिलेल्या घटकांवर प्रश्नमंजुषा घेतली जाते. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आठवडाभर केलेल्या अध्ययनाची पडताळणी करण्याचा प्रयत्न केला जातो.
शिक्षकांच्या अभ्यासमालांनाही प्रतिसाद!
बुलडाणा जिल्ह्यातील काही शाळांमधील तंत्रस्नेही शिक्षकांनी आपापल्या शाळेच्या स्तरावर स्वतंत्र रीतीने मुलांसाठी आॅनलाईन अभ्यासमाला सुरू केल्या असून त्यालासुद्धा त्या त्या शाळांमधील विद्यार्थी सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, विषय सहाय्यक, समुपदेशक या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्न करीत आहेत.
लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत विद्यार्थी शाळेत जरी येऊ शकत नसले तरीही ते या अभ्यासमालेच्या माध्यमातून शैक्षणिक प्रक्रियेत सहभागी आहेत. त्यामुळे त्यांना हे काम करण्याचा निश्चितच आनंद प्राप्त होतो.
- विजयकुमार शिंदे
प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, बुलडाणा.