बुलडाणा जिल्ह्यात कोरोना चाचण्यांचा वेग दीड पटीने वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 12:39 PM2020-09-07T12:39:58+5:302020-09-07T12:40:15+5:30
पुर्वी जेथे दररोज सरासरी ३०० चाचण्या होत होत्या तेथे आता ५०० चाचण्या करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोना चाचण्यांचा वेग दीड पटीने वाढविण्यात आला असून पुर्वी जेथे दररोज सरासरी ३०० चाचण्या होत होत्या तेथे आता ५०० चाचण्या करण्यात येत आहे. त्यामुळे बाधीत रुग्ण वाढण्याचे प्रमाणही जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहे. चाचण्यांची संख्या वाढविल्यामुळे प्रत्यक्ष प्रयोग शाळेतून चाचण्यांचे अहवाल प्राप्त होण्यास विलंब होत असल्याचे चित्र आहे.
परिणामी तपासणी अहवाल त्वरित मिळण्यासाठी बुलडाण्यातील आरटीपीसीआरची लॅब कार्यान्वीत करण्याची प्रक्रिया आरोग्य विभागाने वेगाने हाती घेतली आहे. यासंदर्भात प्रयोगशाळेशी संबंधीत आठ तत्रज्ञांचे प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे. जालना येथे मध्यंतरी प्रयोगशाळेच्या तंत्रज्ञांनी भेट देवून पाहणीही केली होती. तसेच नागपूर येथून प्रारंभी एक तज्ज्ञ बुलडाणा येथे काही काळा येणार असून त्यांच्या मार्गदर्शनात बुलडाण्यातील प्रयोग शाळेत संदिग्ध रुग्णांचे स्वॅब तपासण्यात येणार आहेत.
आगामी आठवड्यात बुलडाण्यातील कोरोना तपासणी प्रयोगशाळा कार्यान्वीत होण्याची शक्यता असून ती प्रत्यक्षात कार्यान्वीत झाल्यास सध्या दररोज प्रलंबीत राहत असलेल्या एक हजार पेक्षा अधिक नमुन्यांचे अहवाल वेळेत मिळणे शक्य होणार आहे. सध्या बुलडाण्यातील संदिग्धांचे नमुने हे अकोला, जालना, नागपूर सह वर्धा येथील खासगी प्रयोग शाळेत तपासण्यासाठी पाठविण्यात येत आहे. त्यामुळे त्यास काहीसा विलंब लागत आहे. त्यातच दीड पटीने कोरोनाच्या चाचण्या जिल्ह्यात वाढविण्यात आल्या आहेत. आता पर्यंत जिल्ह्यातील २४ हजार संदिग्ध रुग्णांच्या तपासण्या करण्यात आल्या असून त्यापैकी प्रत्यक्षात ३, ८४५ जण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. येत्या काळात हा वेग वाढणार असून त्यामुळे प्रसंगी रुग्ण संख्याही वाढण्याची भीती आहे. दुसरीकडे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगलाही अधिक गांभिर्याने घेण्याच्या सुचना आरोग्य यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.
अहवालांची प्रतीक्षा वाढली
कोरोना चाचण्यांचा वेग जिल्हह्यात वाढवण्यात आल्याने दररोज हजार पेक्षा अधिक अहवाल प्रलंबीत राहत आहेत. त्यामुळे संदिग्धांचे अहवाल प्राप्त होण्यास विलंब होत असल्याने अनेकांकडून याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. बुलडाण्याची लॅब सुरू होण्याची गरज आहे.