खरीप पेरणीत राज्यात बुलडाणा जिल्हा अग्रस्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 01:31 PM2019-07-28T13:31:26+5:302019-07-28T14:56:10+5:30
राज्याच्या तुलनेत पेरणी उरकण्यामध्ये बुलडाणा जिल्हा अग्रेसर आहे.
- ब्रम्हानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : खरीप पेरणी करण्यामध्ये राज्यात बुलडाणा जिल्हा अग्रस्थानी असून आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल १०१ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. खरीप हंगामाच्या सरासरी क्षेत्रापेक्षा यावर्षी प्रत्यक्ष पेरणी जास्त झाली आहे. यामध्ये सोयाबीन व कपाशीचा पेरा सर्वाधिक दिसून येतो.
पावसाळ्याच्या सुरूवातीच्या काळात पाऊस लांबला होता. परंतू मृग आणि आद्रा नक्षत्राच्या जोडावर झालेल्या पावसाने जिल्ह्यात खरीप पेरणीला मुहूर्त मिळाला. त्यानंतर जून अखेर व जुलैच्या सुरूवातीला पावसाने हजेरी लावल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरणी उरकून घेतली. जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र ७ लाख ७ हजार ७३२ हेक्टर आहे, त्यापैकी ७ लाख १२ हजार ३८५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. राज्याच्या तुलनेत पेरणी उरकण्यामध्ये बुलडाणा जिल्हा अग्रेसर आहे. राज्यातील एकाही जिल्ह्यामध्ये आतापर्यंत १०१ टक्क्यावर खरीप पेरणी पूर्ण झाल्याचे दिसून येत नाही. जिल्ह्यात खरीप हंगामाच्या सरासरी क्षेत्रापेक्षा प्रत्यक्षातील पेरा जास्त आहे. पेरणी केल्यानंतर मध्यंतरीच्या काळात पावसाने लंबी दडी दिल्याने खरीप पिके संकटात सापडली होती. त्यामुळे दोन दोन पानावर आलेली पिके पावसाअभावी सुकू लागली होती. देऊळगाव राज, सिंदखेड राजा, लोणार या भागात पिके जगवायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला होता. त्यामुळे शेतकºयांनी डवरणीची कामे पूर्ण केली. मात्र गत पाच ते सहा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचे प्रमाण चांगले असल्याने राहिलेल्या पेरण्या पूर्ण झाल्या. तर पिकेही आता चांगली बहरल्याचे दिसून येते.सध्या शेतातील वाढत्या तणांचा नायनाट करण्यासाठी शेतकरी विविध प्रकाचे तणनाशक औषधी फवारणी करत आहेत.
ऊस लागवड
जिल्ह्यात मूग, उडीद, तूर, सोयाबीन, कपाशी ही पीके प्रामुख्याने घेतली जातात. गेल्या काही दिवसांपासून ऊस लागवड करण्याकडे शेतकºयांनी पाठ फिरवली आहे. जिल्ह्यात ऊस लागवडीचे सरासरी क्षेत्र २७३ हेक्टर आहे. त्यापैकी अगदी बोटावर मोजण्या इतक्याच ठिकाणी ऊसाची लागवड होते. मात्र यंदा सरासरी क्षेत्राच्या ४६ टक्के क्षेत्रावर नवीन ऊस लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात १२६ हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड पूर्ण झाली आहे.
सोयाबीन-कपाशी सर्वाधिक
जिल्ह्यात सोयाबीन व कपाशीची पेरणी सर्वाधिक झाली आहे. सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ३ लाख ३४ हजार ५२६ हेक्टर आहे. त्यापैकी ३ लाख ५२ हजार ८२६ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात कपाशीचे सरासरी क्षेत्र १ लाख ९९ हजार २७३ हेक्टर आहे. त्यापैकी २ लाख ८ हजार २२७ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी करण्यात आली आहे. मूग, उडीद व इतर पिकांच्या तुलनेत शेतकºयांचा ओढा सोयाबीन व कपाशी पिकाकडेच आहे.
या पिकांकडे पाठ
जिल्ह्यात सोयाबीन व कपाशी वगळता मूग, उडीद, तूर, ज्वारी, बाजरी या पिकांकडे शेतकºयांनी पाठ फिरवली आहे. ज्वारीची पेरणी ९ हजार ८३१ हेक्टर, बाजरी २४४ हेक्टर, २४ हजार ७०९ हेक्टर, मूग १६ हजार ६५९ हेक्टर, उडीद १७ हजार ८७८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. पूर्वी मूग, उडीद, ज्वारी या पिकांकडे शेतकºयांचा मोठा कल होता. मात्र आता सोयाबीन व कपाशी या दोनच पिकाकडे शेतकरी वळले आहेत.