बुलडाणा जिल्हय़ातील ३५६ गावांना गारपिटीचा तडाखा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 01:33 AM2018-02-12T01:33:53+5:302018-02-12T01:44:12+5:30

बुलडाणा/खामगाव: जिल्हय़ातील ३५६ गावांना गारपीट व अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून, वीज पडून मोताळा तालुक्यात गंभीर जखमी झालेल्या दोन बहिणींपैकी दुपारी एकीचा मृत्यू झाला. नांदुरा तालुक्यातील वसाडी येथे झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. गारपिटीच्या तडाख्यात सापडलेले ११ जण जखमी झाले आहेत. 

Buldana district's 356 villages hit the hail! | बुलडाणा जिल्हय़ातील ३५६ गावांना गारपिटीचा तडाखा!

बुलडाणा जिल्हय़ातील ३५६ गावांना गारपिटीचा तडाखा!

Next
ठळक मुद्देवीज आणि झाड पडून दोन ठार गारपिटीदरम्यान जिल्हय़ात १२ जखमी 

नीलेश जोशी/योगेश फरपट । 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा/खामगाव: जिल्हय़ातील ३५६ गावांना गारपीट व अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून, वीज पडून मोताळा तालुक्यात गंभीर जखमी झालेल्या दोन बहिणींपैकी दुपारी एकीचा मृत्यू झाला. नांदुरा तालुक्यातील वसाडी येथे झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. गारपिटीच्या तडाख्यात सापडलेले ११ जण जखमी झाले आहेत. 
राज्य शासनाच्या स्थायी आदेशानुसार महसूल यंत्रणेने गारपिटीचा सर्व्हे करण्यास प्रारंभ केला असून, मंडळ अधिकारी, तहसीलदारांनी त्यासाठी सकाळीच शेतशिवार गाठले होते. सोबतच कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी कृषी अधिकारी व विमा अधिकार्‍यांची तातडीने बैठक घेऊन आनुषंगिक कार्यवाही करण्याचे आदेश यंत्रणेला दिले आहेत.
बुलडाणा जिल्हय़ातील तेराही तालुक्यात गारपिटीसह वादळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये जिल्हय़ातील संत्रा, मोसंबी, गहू, हरभरा, आंबा, कांदा, डाळिंब, द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. दिवसभर जिल्हय़ात ढगाळ वातावरण होते, तर ठरावीक अंतराने जिल्हय़ात पाऊस पडला. जिल्हय़ात दुपारीही काही गावांमध्ये गारपीट झाली. प्रारंभी १५ ते २0 मिनिट गारपीट झाल्यानंतर  पावसाने हजेरी लावली. प्रारंभी बोराएवढय़ा पडणार्‍या गारा नंतर लिंबाएवढय़ा पडू लागल्या होत्या. 


घाटाखाली शेतमजुरासह चिमुकला जखमी
घाटाखालील नांदुरा, संग्रामपूर, खामगाव आणि जळगाव जामोद  तालुक्यात रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, संग्रामपूर तालुक्यातील पिंगळी बु. येथे आर्यन अकबर सुरत्ने या चिमुकल्याच्या अंगावर टीनपत्राचे घर कोसळून तो जखमी झाला, तर लाडनापूर शिवारात ९ मजूर गारपिटीच्या तडाख्यात अडकल्याने जखमी झाले. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे रुग्णालयीन सूत्रांनी स्पष्ट केले. घाटाखाली रविवारी सकाळी ७.३0 ते १0.३0 वाजेपर्यंत नांदुरा, संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यात मोठय़ा प्रमाणात गारपीट होऊन नुकसान झाले. कांदा, हरभरा, पान मळ्य़ांचे यात नुकसान झाले. खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा, काळेगाव, माक्तासह खामगाव शहरानजीकच्या परिसरातील पिकांची हानी झाली. दरम्यान, आमदार अँड. आकाश फुंडकर यांनी नुकसानग्रस्त गावांना भेटी देऊन शेतकर्‍यांना धीर दिला.  आमदार डॉ. संजय कुटे यांनीसुद्धा संग्रामपूर तालुक्यातील गावांना भेटी देऊन नुकसानाचा आढावा घेतला. बोरखेड, वारखेड, सगोडा, दानापूर, टुनकी, सायखेड या ठिकाणी गहू, हरभरा, मका, संत्रा आदी पिकांचे नुकसान झाले. नांदुरा तालुक्यातील निमगाव, खामखेड, भुईशिंगा, नारखेड, अवधा आदी ठिकाणी नुकसान झाले. संग्रामपूर तालुक्यातील ९५ गावे गारपिटीमुळे प्रभावित झाल्याचे सांगण्यात येत आहे.

२0१४ ची आठवण 
रविवारच्या गारपिटीमुळे २0१४ मधील गारपिटीची आठवण होत आहे. बुलडाणा जिल्हय़ात त्यावेळी ४0२ गावात तुफान गारपीट झाली होती. जीवित हानीसह पशुधन हानीही त्यावेळी मोठय़ा प्रमाणावर झाली होती.  त्यावर्षी तब्बल चार वेळा उन्हाळ्य़ात गारपिटीचा तडाखा बसला होता. लोणार तालुक्यातील १७ ते १८ गावे यामध्ये मोठय़ा प्रमाणावर बाधित झाली होती. लोणारच्या सीमावर्ती भागातील एका गावात तर तापमान गारपिटीमुळे शून्य डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते तर बोरखेडी परिसरातील विहिरीत साचलेला गारांचा ढीग तब्बल चार दिवस वितळला नव्हता. जिल्हय़ात १९८५ पासून अवकाळी पाऊस व गारपीट होत असल्याचे पुरावे प्रशासनाकडे आहेत. तत्कालीन जिल्हाधिकारी किरण कुरुंदर यांनी व्यक्तीश: हा मुद्दा हाताळून जिल्हय़ातील हवामान बदलाचा शेतकर्‍यांना फटका बसत असल्याचे दृष्टिपथास आणून दिले.

दोन बहिणींवर पडली वीज; एकीचा मृत्यू, एक गंभीर
मोताळा तालुक्यात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या निकिता गणेश राठोड (१६) आणि नेहा गणेश राठोड (१३) या दोघींवर वीज पडून निकिताचा मृत्यू झाला. नेहावर सध्या बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. त्यांच्या आईसह इसालवाडी शिवारात त्या कापूस वेचणीसाठी गेल्या होत्या. दीड वाजेच्या सुमारास त्यांच्या अंगावर वीज पडली. त्यामुळे नागरिकांनी त्यांना मोताळा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र निकिताचा बुलडाणा येथे आणत असताना मृत्यू झाला. नेहा जखमी असून, तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान, बुलडाणा जिल्हय़ात संग्रामपूर आणि देऊळगाव राजात गारपीट आणि वादळी वार्‍याच्या तडाख्यात सापडलेले १२ जण जखमी झाली आहे. नांदुरा तालुक्यातील वसाडी येथे अंगावर झाड पडून खामगाव तालुक्यातील ज्ञानगंगापूर येथील अजय काशीनाथ महाले गंभीर जखमी झाले होते. वसाडी येथील बोडखे यांच्या मळ्य़ाजवळ रस्त्यालगत  असलेले महारुखाचे झाड त्यांच्या अंगावर पडले होते. त्यामुळे त्यांना खामगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पाच गुरे दगावली 
जिल्हय़ातील या ३५६ गावात झालेल्या गारपिटीदरम्यान मेहकर तालुक्यातील समाधान टाले आणि केशव टाले यांच्या दोन वगारी आणि संग्रामपूर तालुक्यातील हमशा फकिरा भारसाकळे (रा. पिंगळी) यांच्या दोन गायी आणि निमखेड येथील संजय खुमकर यांचे बोकूड गारपिटीच्या तडाख्यात आल्याने दगावले.

कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी पीक विमा कंपन्यांची बैठक बोलविण्याचे दिले निर्देश
विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातील काही भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे तथा गारपिटीमुळे शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानाचा सर्व्हे स्थायी आदेशानुसार त्वरित करण्याबाबतचे निर्देश कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिले आहेत. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने सोमवारीच विमा कंपन्यांची बैठक बोलावून गावनिहाय आकडेवारी त्यांना कृषी आणि महसूल विभागाने उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश दिले आहेत. जेणेकरून नैसर्गिक आपत्तीत शेतकर्‍यांना पीक विम्याचा लगोलग आधार मिळण्यास मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सोबतच राज्यातील अवकाळी पाऊस व गारपिटीचा आढावा तत्परता दाखवत कृषिमंत्र्यांनी घेतला. कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विजयकुमार यांच्याशीही या मुद्दय़ावर चर्चा केली. सोबतच ज्या गावांमध्ये गारपीट व अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाच्या उभ्या पिकाचे तसेच काढणी पश्‍चात मळणीसाठी ठेवलेल्या धान्याचे नुकसान झाले आहे त्याची त्वरित विमा कंपन्यांना माहिती कळविण्यात यावी, तसेच तीन दिवसात अद्ययावत माहिती उपलब्ध करून विम्याच्या लाभाची किचकट प्रक्रिया शेतकर्‍यांसाठी सहज होईल, अशा पद्धतीने यंत्रणांनी कार्य करावे, असे सांगितले. 

तत्काळ पंचनामे करा - खा. प्रतापराव जाधव
बुलडाणा:  नैसर्गिक आपत्तीचा ससेमिरा शेतकर्‍यांच्या मागे लागला असून, खरिपानंतर रब्बीतही अवकाळी पाऊस व रब्बीचा फटका शेतकर्‍यांना बसला आहे. गारपिटीमुळे शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचे तत्काळ पंचनामे करण्यात येऊन शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्यासाठी त्वरेने पाऊले उचलण्यात यावी, अशी मागणी खा. प्रतापराव जाधव यांनी केली आहे. विशेष म्हणजे शेतकर्‍यांनी प्रशासकीय यंत्रणेकडून स्वत:च्या शेतातील नुकसानाचे पंचनामे करून घेत रीतसर त्याची नोंद घ्यावी, तसेच शिवसेना कार्यकर्त्यांनी शेतकर्‍यांना या कामासाठी मदत करावी, असेही आवाहन शिवसेना जिल्हासंपर्क प्रमुख खा. प्रतापराव जाधव यांनी केले. जिल्ह्यातील बहुतांशभागात गारपिटीने शेतकर्‍यांच्या शेतात उभे असलेले गहू, हरभरा, मका, कांदा यांच्यासह भाजीपालावर्गीय पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. फळबागांनाही फटका बसला आहे. आधीच खरिपात बोंडअळीने व भाव मंदीने वैतागलेला शेतकरी पुरता खचला आहे. गारपिटीचा मारा खूप मोठा असल्याने उभी पिके आडवी झाल्याने मदतीची गरज आहे.

६ ते १0 एमएम आकाराच्या गारी 
संग्रामपूरसह जिल्हय़ातील काही भागात सहा ते दहा एमएम आकाराच्या गारी पडल्याचे काहींचे म्हणणे आहे. त्यामुळे काही शेतमजूरही यामुळे जखमी झालेलेले आहते. प्राथमिक वृत्तानुसार आठ ते दहा मजूर संग्रामपूर तालुक्यात जखमी झाले असल्याचे वृत्त आहे; परंतु जसजशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागास येत आहे तसतसे गारपिटीचे गंभीर स्वरूप समोर येत आहे.

Web Title: Buldana district's 356 villages hit the hail!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.