बुलडाणा जिल्ह्यात सरासरी २५ टक्के कमी पाऊस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 09:59 PM2017-08-21T21:59:22+5:302017-08-21T21:59:30+5:30
सर्वत्र रिमझिम पाऊस, प्रकल्प कोरडेच!
हर्षनंदन वाघ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात मागिल चार-पाच दिवसांपासून सर्वत्र रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. या पावसामुळे पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी जिल्ह्यातील प्रकल्प मात्र कोरडे आहेत. मागिल वर्षीेपेक्षा यावर्षी जवळपास सरासरी २५ टक्के कमी पाऊस असल्यामुळे भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
यावर्षी पाऊस चांगला होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले होते. त्यानुसार थोड्या उशिरा का होईना, पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे अनेक शेतकºयांनी पेरणीला सुरुवात केली; मात्र पिकांनी जमिनीबाहेर मान काढल्यानंतर पावसाने दडी मारली. त्यामुळे अनेक परिसरातील पिके कोमेजली. दरम्यान, दोन दिवस कमी-जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने काही प्रमाणात पिकांना दिलासा मिळाला, तर अनेक शेतकºयांनी दुबार पेरणी केली. त्यानंतर पुन्हा आॅगस्ट महिन्यात सुरुवातीला दडी मारल्याने चांगल्या परिस्थितीत असलेल्या पिकांनी माना टाकायला सुरुवात केली. आता पुन्हा मागिल चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. या पावसामुळे पुन्हा शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत; मात्र पावसाचे प्रमाण पाहता भविष्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान सरासरी ७१२.७ मि.मी. आहे. मागिलवर्षी आज पर्यंत ५५५.४ मि.मी. पाऊस झाला होता, तर यावर्षी ४१९.२ मि.मी. पाऊस झाला आहे. यावरून मागिल वर्षीपेक्षा यावर्षी सरासरी २५ टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे यावर्षी सरासरी पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे जिल्ह्यात प्रकल्पात अल्प जलसाठा असून, भविष्यात तीव्र पाणी पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
आतापर्यंत सरासरी ४१९ मि.मी. पाऊस
यावर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर आजपर्यंत सरासरी ४१९.२ मि.मी. पाऊस झाला असून, रविवारी रात्री ते सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३२.६ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यात बुलडाणा तालुक्यात २९.० मि.मी., चिखली १७.०, देऊळगाव राजा ४८.०, मेहकर १६.०, लोणार ९०.०, सिंदखेड राजा ३९.६, मलकापूर ३२.०, नांदूरा ३६.०, मोताळा ४२.०, खामगाव ०४.२, शेगाव २१.०, जळगाव जामोद ३७.०, संग्रामपूर तालुक्यात १०.० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.
तब्बल ४५ दिवसांनंतर पावसाची हजेरी
धाड : तब्बल ४५ दिवसानंतर बुलडाणा तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावत खरिपांच्या पिकांना जीवनदान दिले; मात्र या भागात प्रदीर्घ पावसाच्या उघडीपीचा सोयाबीन, मका, कपाशी या नगदी पकांना ३० टक्के फटका बसला आहे. शेवटी प्रदीर्घ खंडानंतर १९ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सुरू झालेला संततधार पाऊस २० आॅगस्ट रोजी सकाळी १० पर्यंत सुरूच होता. अगोदरच
कर्जमाफीच्या घोषणा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यामध्ये हैराण झालेल्या शेतकºयास दुष्काळी स्थितीने गलीतगात्र केले. शेतशिवारात पिके सुकून माना टाकताना दिसत होते.