बुलडाणा जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी रेट चार टक्क्यांनी घसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 11:41 AM2021-02-20T11:41:20+5:302021-02-20T11:41:38+5:30
Buldhana Corona News जिल्ह्यात गेल्या चार दिवसात सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: बुलडाणा: जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण सातत्याने वाढत असतााच ॲक्टीव्ह रुग्णांची संख्याही पाच दिवसात दुपटीने वाढली असल्याचे चित्र आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही (रिकव्हरी रेट) चार टक्क्यांनी घसरलेले आहे. गेल्या पाच दिवसात सक्रीय रूग्णांची संख्या ५२३ वरून १ हजार ५२ वर पाेहाेचली आहे.
तीन दिवसापूर्वी दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट हा ३१ टक्के होता नंतर २२ टक्के होवून आज १६ टक्क्यावर पोहोचल्याने काहीसा दिलासा मिळाला असला तरी कोरोना चाचण्यांची संख्या वाढविल्याने बाधीतांचे प्रमाणही त्यात वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे. परिणामी आता सुपरस्प्रेडरचा शोध घेवून त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यावर आरोग्य यंत्रणा भर देत आहे. त्यानुषंगाने माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात सापडलेल्या ५६ हजार १०० दुर्धर आजार असणाऱ्यांपैकी आतापर्यंत ५,३८८ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त दुर्धर आजार असणाऱ्यांपैकी आणखी काही संदिग्धांच्या चाचण्या करण्यास आराेग्य यंत्रणेने पावले उचललेली आहेत. त्यासदंर्भाने पालिकांनाही पथके नियुक्त करून सुपर स्प्रेडरसह बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्यांपैकी कोणी संदिग्ध असल्यास त्यांच्यावरही लक्ष केंद्रीत केले जावे असे सुचीत केल्या गेले आहे. परिणामी पालिकांसह ग्रामीण भागातही यंत्रणा आता सक्रीय झाली आहे. तहसिलदारांनाही निर्देश दिल्याची माहिती आहे. दुसरीकडे डिसेंबर २०२० मध्ये बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे जवळपास ९६ टक्क्यांवर होते ते आता ९२ टक्क्यावर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात सक्रीय रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. १५ ते १६ फेब्रुवारी दरम्यान बुलडाणा जिल्ह्यात ५२३ कोरोनाचे ॲक्टीव्ह रुग्ण होते त्यांची संख्या १९ फेब्रुवारी रोजी १०५२ झाली आहे. म्हणजे गेल्या पाच दिवसाचा विचार करता ५१ टक्क्यांनी कोरोना बाधीत रुग्ण वाढले आहे.
चार दिवसात सहा जणांचा मृत्यू
जिल्ह्यात गेल्या चार दिवसात सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये बुलडाणा शहर परिसरातील दोन, चिखली तालुक्यातील दोन, मलकापूर येथील एक व मेहकर तालुक्यातील एकाचा समावेश आहे. नाही म्हणायला बुलडाणा जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदर हा १.१७ टक्के असून तो नियंत्रणात आहे. पण चार दिवसात सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. बुलडाणा जिल्ह्यात आज पर्यंत कोरोनामुळे १८३ जणांचा मृत्यू झालेला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसगर्ग वाढल्याच्या पार्श्वभूमीवर कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. आरटीपीसीआर टेस्टचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. तसेच रॅपीट टेस्टही वाढविण्यात आल्या आहेत.
- डॉ. नितीन तडस,
जिल्हा शल्यचिकित्सक, बुलडाणा