बुलडाणा जिल्हय़ातील बनावट दिव्यांग शिक्षक ‘रडार’वर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 12:36 AM2017-12-23T00:36:29+5:302017-12-23T00:37:44+5:30
बुलडाणा : शिक्षकांची बदली प्रक्रिया व पदोन्नतीदरम्यान जिल्ह्यातील काही शिक्षकांनी दिव्यांग असल्याचे बोगस प्रमाणपत्र सादर करीत लाभ घेतल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे शासनाच्या आदेशान्वये जिल्हा परिषद प्रशासनाने संबंधितांच्या प्रमाणपत्रांची जिल्हा शल्यचिकित्सकांकडून पडताळणी करण्याचा निर्णय घेतला असून, यातील दोषींवर कारवाईचा इशारा दिला आहे.
हर्षनंदन वाघ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शिक्षकांची बदली प्रक्रिया व पदोन्नतीदरम्यान जिल्ह्यातील काही शिक्षकांनी दिव्यांग असल्याचे बोगस प्रमाणपत्र सादर करीत लाभ घेतल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे शासनाच्या आदेशान्वये जिल्हा परिषद प्रशासनाने संबंधितांच्या प्रमाणपत्रांची जिल्हा शल्यचिकित्सकांकडून पडताळणी करण्याचा निर्णय घेतला असून, यातील दोषींवर कारवाईचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागात एकूण ३७४ दिव्यांग शिक्षक असून, या निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषदेच्या विविध सभा तसेच जिल्हा व तालुक्यांतर्गत बदली प्रक्रियेत काही शिक्षकांनी दिव्यांगाचे बोगस प्रमाणपत्र सादर करीत लाभ घेतल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. संबंधित प्रमाणपत्रांच्या आधारे शिक्षकांनी पदोन्नती, बदलीतून सूट आदी सुविधांचा लाभ घेतला आहे. याबाबत हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना उपस्थित करण्यात आल्या होत्या. याची दखल घेऊन ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना २0 डिसेंबर रोजीच्या एका आदेशान्वये दिव्यांग शिक्षकांनी सादर केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासंबंधी प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच जिल्हा शल्यचिकित्सकांमार्फत दिव्यांग असणार्या व्यक्ती व त्यांच्याकडे असणार्या दिव्यांग प्रमाणपत्रांची चौकशी होणार आहे. यासाठी तालुकानिहाय शिबिर घेऊन दिव्यांग शिक्षकांची झाडाझडती आगामी काही दिवसांत होईल. या निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.
तालुकानिहाय चौकशी होणार
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे एकूण ३७४ दिव्यांग शिक्षक असल्याची नोंद आहे. त्यात २९१ मराठी सहायक शिक्षक, १८ उर्दू सहायक शिक्षक, ६१ मराठी मुख्याध्यापक, ५ उर्दू मुख्याध्यापक, १७ केंद्र प्रमुखांचा समावेश आहे. त्यांच्या प्रमाणपत्रांची तालुकानिहाय चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे बोगस प्रमाणपत्र सादर करणार्या शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे.
फौजदारी कारवाईचे संकेत
या दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी कार्यवाहीमुळे जे शिक्षक वर्षानुवर्षे एकाच तालुक्यात ठाण मांडून असून, शासनाच्या सुविधा घेत आहेत, त्यांच्यावर जिल्हा शल्यचिकित्सकांमार्फत होणार्या चौकशीदरम्यान दोषी आढळणार्या शिक्षकांवर शासनाची दिशाभूल करीत सुविधांचा लाभ लाटल्याप्रकरणी कारवाई करण्यात येणार आहे