बुलडाणा जिल्ह्यातील तडीपारांनी गाठले शतक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 02:31 PM2019-09-03T14:31:14+5:302019-09-03T14:32:45+5:30
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवर पोलिस नजर ठेऊन आहेत.
- ब्रम्हानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: सण, उत्सवादरम्यान जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवर पोलिस नजर ठेऊन आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून हजारो गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात तडीपारांच्या संख्येने शतक गाठले आहे.
आजपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवासह मोहरम आणि आगामी काळातील दुर्गाउत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था आबाधीत रहावी, यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागणार नाही, या दृष्टीने दोन महिन्यापूर्वीपासूनच जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी प्रतिबंधक कारवाईचा कृती आराखडा तयार केला होता.
त्यानुसार गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेल्यांवर प्रतिबंधक कारवाई जिल्ह्यात सुरू करण्यात आली होती. तथा वेळोवेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेऊन जिल्हा पोलीस अधिक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगाने प्रभावी अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देशच यंत्रणेला दिले. गतवर्षी गणोशोत्सव व मोहरम काळात जिल्ह्यातील चार हजार ४४ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर पोलिसांचा वॉच होता. तर यावर्षी या संख्येत वाढ झाल्याची माहिती आहे. कायदा व सुव्यवस्था बाधीत करण्याचा प्रयत्न करणाºया ६५ गुन्हेगारांना गतवर्षीच्या उत्सव काळात तडीपार करण्यात आले होते. तर यावर्षी तडीपारांची संख्या १०० च्या आसपास पोहचली आहे. यामध्ये काही लोक तडीपार झाले आहेत, तर काही प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी स्तरावर आहेत. सध्या त्यानुषंगाने कारवाई सुरू आहे. जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी आणि सण, उत्सवाच्या काळात शांतता टिकण्यासाठी, तडीपारांबरोबच हजारो गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई सुद्धा करण्यात आली आहे. या सर्व गुन्हेगारांवर पोलीस नजर ठेवून असल्याचेही सुत्रांनी सांगितले.
सण, उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्याच्या अनुषंगाने प्रतिबंधक कारवाईचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेल्या जवळपास ५ हजार लोकांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. तडीपारींची संख्याही १०० च्या आसपास आहे. कायदा व सुव्यवस्था बाधीत करण्याचा प्रयत्न कोणी करू नये, अन्यथा कठोर प्रतिबंधक कारवाई करण्यात येईल.
- दिलीप भुजबळ पाटील,
जिल्हा पोलीस अधिक्षक, बुलडाणा.