बुलडाणा : शेतमाल प्रक्रिया उद्योगांवर १२ कोटींचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 02:38 PM2020-02-03T14:38:03+5:302020-02-03T14:38:13+5:30
गटशेतीअंतर्गत शेतमाल प्रक्रिया उद्योगांवर अनुदानापोटी सुमारे १२ कोटींचा खर्च करण्यात येत आहे.
- योगेश देऊळकार
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कृषी विभागाच्या ‘आत्मा’ प्रकल्पाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या गटशेती प्रकल्पाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दोन वर्षामध्ये जिल्ह्यात १६ प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. यासाठी ७१३ शेतकऱ्यांकडून १ हजार ६८० एकर क्षेत्रावर पिकांचे नियोजन आहे. जिल्ह्यातील गटशेतीअंतर्गत शेतमाल प्रक्रिया उद्योगांवर अनुदानापोटी सुमारे १२ कोटींचा खर्च करण्यात येत आहे.
सन २०२२ पर्यंत शेतकºयांचे उत्पन्न वाढविण्यासाठी निविष्ठ प्रशिक्षण, सिंचन, यांत्रिकीकरण, काढणी पश्चात तंत्रज्ञान, कृषी माल प्रक्रिया व पणन इत्यादी बाबी महत्त्वाच्या ठरतात. राज्यातील शेतकºयांची जमिन धारणा अत्यंत कमी आहे. यामुळे शेतकºयांच्या उत्पन्नात भरीव वाढ होण्यासाठी सामूहीक शेती, आधुनिक शेती पद्धती व काटेकोर नियोजनाची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने शेतकरी गटांमार्फत गटशेतीस प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. गटशेती अंतर्गत शेतकºयांनी एकत्र येऊन सामूहीकरीत्या नियोजनबद्ध शेती करणे, शेती उत्पन्नावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन करणे, एकत्रितरीत्या विपणन करणे यासाठी सामूहीक स्वरूपाची व्यवस्था निर्माण करणे, शेती या व्यावसायिक जीवन पद्धतीवर स्वत:सह गट समूहाची, उन्नती व विकास घडवून आणण्यात गटशेतीची भूमीका महत्त्वपूर्ण आहे.
या सर्व पक्रियेसाठी जिल्ह्यात गटशेतीअंतर्गत गेल्या दोन वर्षांत १६ प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. या माध्यमातून ७१३ शेतकºयांनी १६८० एकर क्षेत्रावर पिकांचे नियोजन केले आहे. यामध्ये बुलडाणा ४, मोताळा २, मलकापूर १, शेगाव १, खामगाव २, चिखली ३, नांदुरा १, संग्रामपूर १ तर लोणार तालुक्यातील एका शेतकरी गटाचा समावेश आहे. यासाठी एकुण २७ कोटी ५० लाखांचा खर्च आवश्यक आहे. यावर शेतकरी गटांना ५० अनुदान देण्यात आले आहे. अनुदानापोटी १२ कोटींचा खर्च शासनाकडून करण्यात आला आहे. जिल्ह्यातील १६ प्रकल्पांपैकी बुलडाणा ४, चिखली १ व खामगाव तालुक्यातील १ अशा एकुण ६ गटांचे काम पूर्ण झाले आहे. इतर गटांची कामे सुरू असून ही कामेदेखील लवकरच पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने कृषी विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत.
दुग्ध व्यवसायाला पसंती
जिल्ह्यात मान्यता मिळालेल्या १६ शेतकरी गटांनी विविध शेतीपूरक व्यवसायांचा आधार घेतला आहे. यामध्ये सर्वाधिक पसंती दुग्ध व्यवसायाला मिळत असल्याचे दिसून येत आहे. एकुण १६ शेतकरी गटांपैकी ६ शेतकरी गटांनी दुग्धव्यवसायाची निवड केली आहे. यापाठोपाठ कुक्कुट पालन २, कडधान्य प्रक्रिया २, फ्लोअर मिल २, फळे भाजीपाला व मसाला प्रक्रिया उद्योग २, ओवा प्रक्रिया १ तर जिनींग व प्रेसिंग उघोगाची एका शेतकरी गटाने निवड केली आहे. या माध्यमातून आर्थिक स्तर उंचावण्याचा उत्तम प्रयत्न संबंधित शेतकºयांकडून होत आहे. याला कृषी विभागाचेदेखील उत्तम प्रोत्साहन मिळत आहे.